आज पहाटे चार अंतराळवीरांना घेऊन आलेले कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ समुद्रावर अलगदपणे उतरले.  (source- NASA)
आंतरराष्ट्रीय

Sunita Williams return | पॅराशूट उघडलं, नंतर समुद्रात लँडिंग, 'डॉल्फिन्स'कडून स्वागत, पाहा Video

सुनिता विलियम्स यांनी पृथ्वीवर परतल्यानंतर हात उंचावून केले अभिवादन

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून अंतराळवीर सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर हे दोघे इतर अंतराळवीरांसह आज बुधवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३.२७ वाजता पृथ्वीवर परतले. गेल्या वर्षी जूनमध्ये अवघ्या आठ दिवसांच्या मोहिमेसाठी ते गेले होते. पण पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील सुनिता विलियम्स यांचा मुक्काम ९ महिन्यांहून अधिक काळ वाढला. त्यांच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. आता त्या ९ महिने १४ दिवसांनंतर पृथ्वीवर परतल्या.

या अंतराळवीरांना बोईंगचे स्टारलायनर अंतराळयान पृथ्वीवर परत आणणार होते. पण त्यात बिघाड झाला. यामुळे त्यांना पृथ्वीवर परत आणण्यास दीर्घकाळ वाट पहावी लागली. त्यांना घेऊन अखेर एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले. या अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर पोहोचण्यासाठी १७ तासांचा वेळ लागला. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३:२७ वाजता चार अंतराळवीरांना घेऊन आलेले कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ समुद्रावर अलगदपणे उतरले.

Sunita Williams return | अंतराळवीरांचे स्वागत....

समुद्राच्या पृष्ठभागावर ते उतरल्यानंतर नियंत्रण कक्षाने अंतराळवीरांचे स्वागत केले. "निक, एलेक, बुच, सुनी... स्पेसएक्समधून घरी परत आल्याबद्दल तुमचे स्वागत आहे." अशा शब्दांत त्यांचे स्वागत करण्यात आले.

ड्रॅगन कॅप्सूल कसे उतरले समुद्रात?

ड्रॅगन कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना त्याचा वेग ताशी १७,००० मैल होता. तो काही मिनिटांतच कमी झाला. पहाटे ३:२४ वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा ड्रॅगन कॅप्सूलचे दोन पॅराशूट उघडले गेले. यामुळे त्याचा वेग आणखी कमी झाला. या दरम्यान, एक धक्का बसल्यानंतर कॅप्सूलचा वेग आणखी मंदावला आणि ते अलगदपणे समुद्रात उतरले. त्यानंतर रिकव्हरी टीमने तेथे पोहोचून पहिल्यांदा सुरक्षेची तपासणी केली आणि पॅराशूट हटवले. दरम्यान, समुद्राच्या पाण्यावर कॅप्सूल उतरल्यानंतर त्याच्याभोवती डॉल्फिन पोहोताना दिसले. नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरने या क्षणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

त्यानंतर रिकव्हरी टीमने अंतराळयान बोटीवर चढवले. यानंतर जगभरातील लोकांनी सुनिता विलियम्स आणि इतर अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर येताना पाहिले. तसेच सुनिता जेव्हा स्पेसक्राफ्ट ड्रॅगनमधून बाहेर आल्या तेव्हा त्यांनी हात उंचावून अभिवादन केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आश्वासन पूर्ण केले- व्हाईट हाऊस

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अंतराळात अडकलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना सुरक्षित पृथ्वीवर आणण्याचे आश्वासन दिले होते आणि ते त्यांनी पूर्ण केले आहे, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. एक्सवरील (पूर्वीचे ट्विटर) एका पोस्टमध्ये व्हाईट हाऊसने स्पेसएक्सचे ड्रॅगन अंतराळयान फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर खाली उतरतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. "९ महिने अंतराळात अडकल्यानंतर नासाचे अंतराळवीर अखेर पृथ्वीवर उतरले" असे व्हाईट हाऊसने पुढे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT