

पुढारी ऑनलाईन डेस्क : बुधवारी पहाटे, स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल सुनिता विलियम्स आणि इतर चारही अंतराळवीरांना घेऊन फ्लोरिडाच्या समुद्रात यशस्वी लँडिंग झाले. सुनिता विलियम्स नऊ महिने अंतराळात घालवून अखेर सुखरूप पृथ्वीवर परतल्या आहेत. तब्बल 286 दिवस अंतराळात घालवल्यानंतर, सुनिता विलियम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा पृथ्वीच्या ताज्या हवेत मोकळा श्वास घेतला.
(Sunita Williams Space Mission)
अंतराळातून पृथ्वीपर्यंतचा हा प्रवास 17 तासांचा होता. मात्र, या लँडिंग प्रक्रियेदरम्यान सर्वांना श्वास रोखायला लावणारा 7 मिनिटांचा एक महत्त्वाचा टप्पा होता. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून (ISS) पृथ्वीपर्यंतचा 17 तासांचा प्रवास अत्यंत आव्हानात्मक ठरला.
जेव्हा स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते, तेव्हा त्याचे तापमान 1600 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. याच वेळी सात मिनिटांसाठी कम्युनिकेशन ब्लॅकआउट (Communication Blackout) होतो. हा काळ सामान्य असला तरीही अत्यंत महत्त्वाचा आणि जोखमीचा असतो, कारण या दरम्यान नासाचा स्पेसक्राफ्टशी कोणताही संपर्क राहत नाही.
स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. मात्र, सात मिनिटांनंतर, बुधवारी पहाटे सुमारे 3.20 वाजता, स्पेसक्राफ्टशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यात आला. तरीही, हा सात मिनिटांचा ब्लॅकआउट काळ कोणत्याही स्पेसक्राफ्टसाठी निर्णायक ठरतो. या काळात प्रचंड उष्णतेमुळे स्पेसक्राफ्ट क्रॅश होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
1 फेब्रुवारी 2003 रोजी नासाच्या कोलंबिया अंतराळयानाला असाच अपघात झाला होता. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच यान कोसळले होते, आणि प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांच्यासह संपूर्ण क्रूचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे, कोणत्याही स्पेसक्राफ्टसाठी हा टप्पा अत्यंत जोखमीचा आणि काळजीपूर्वक हाताळण्यासारखा असतो.
जेव्हा एखादा स्पेसक्राफ्ट अंतराळातून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो, तेव्हा त्याचा वेग सुमारे 28,000 किमी प्रति तास असतो.
या प्रचंड वेगाने प्रवेश करताना स्पेसक्राफ्ट वायुमंडलातील कणांशी घर्षण करतो, ज्यामुळे तापमान अत्यंत वाढते.
या उष्णतेमुळे प्लाझ्मा तयार होतो, जो रेडिओ सिग्नल्स अडवतो, त्यामुळे मिशन कंट्रोल आणि स्पेसक्राफ्ट यांच्यातील संपर्क तुटतो.
या अवस्थेला "कम्युनिकेशन ब्लॅकआउट" म्हणतात.
या टप्प्यात स्पेसक्राफ्ट कोणत्याही बाह्य संपर्क माध्यमांशी जोडलेला नसतो, त्यामुळे हा अत्यंत धोकादायक टप्पा मानला जातो.
या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करत स्पेसक्राफ्टने अखेर समुद्रात यशस्वी लँडिंग केले.
एकामागोमाग चारही अंतराळवीर सुखरूप बाहेर आले.
तब्बल 286 दिवस अंतराळात घालवल्यानंतर सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा पृथ्वीच्या ताज्या हवेत श्वास घेतला.
1 फेब्रुवारी 2003, हा दिवस अंतराळ विज्ञानाच्या इतिहासातील एक दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडल्याचा साक्षीदार ठरला. नासाच्या स्पेस शटल कोलंबिया (STS-107) मिशनमध्ये भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्यासह सातही अंतराळवीरांचा शटलच्या अपघातात मृत्यू झाला.
5 फेब्रुवारी 2003 रोजी भारताच्या पंतप्रधानांनी हवामान विषयीच्या उपग्रहाला ‘कल्पना 1’ हे नाव दिले. कल्पना चावला यांनी आपल्या धैर्य, चिकाटी, जिद्द आणि बलिदानाने देशाचे नाव उज्ज्वल केले. कल्पना चावला या आज आपल्यात नसल्यातरी त्यांच्या स्मृती आजही आपल्या मनात कायम आहेत.
16 जानेवारी 2003: कोलंबिया स्पेस शटल अंतराळात पाठवण्यात आले.
उड्डाणावेळी शटलच्या डाव्या पंखावरील इन्सुलेशन फोमचे तुकडे निघाले, यामुळे यानाचे थर्मल प्रोटेक्शन सिस्टम (TPS) कमकुवत झाली.
1 फेब्रुवारी 2003: पृथ्वीच्या वातावरणात पुनःप्रवेश करताना, शटलच्या कमकुवत भागावर प्रचंड उष्णतेचा परिणाम झाला.
उष्णतेच्या तीव्रतेमुळे शटलचे नियंत्रण बिघडले आणि काही मिनिटांतच कोलंबिया अंतराळयान हवेतच तुकडे तुकडे झाले.
यातील सातही अंतराळवीरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
कल्पना चावला
रिक हसबंड
विल्यम मॅककूल
मायकेल अँडरसन
इलान रॅमन
लॉरेल क्लार्क
डेव्हिड ब्राऊन