आंतरराष्ट्रीय

Google CEO Salary | ६३,००,००,००,००० रुपये...पगार आहे की कुबेराचा खजिना? गुगल CEO सुंदर पिचाई यांना मिळाली घसघशीत 'इन्क्रिमेंट'

Google CEO Salary | पिचाई यांच्या वार्षिक पॅकेजचा भाग परफॉर्मन्स स्टॉक युनिट्समधून

पुढारी वृत्तसेवा

सुंदर पिचाई हे २००४ मध्ये गुगलमध्ये रुजू झाले. गुगल क्रोम विकसित करण्‍याबरोबरचअँड्रॉइड सिस्टीमचे नेतृत्व करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचीऑगस्ट २०१५ मध्ये गुगलच्या सीईओपदी नियुक्ती झाली. तेव्हापासून त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने लक्षणीय प्रगती केली आहे.

Google CEO Sundar Pichai Salary

नवी दिल्ली : गुगलचे (अल्फाबेट) सीईओ सुंदर पिचाई यांच्या पगारात मोठी वाढ झाली असून, पुढील तीन वर्षांत त्यांचे एकूण मानधन तब्बल $६९२ दशलक्ष (भारतीय चलनानुसार सुमारे ६३ अब्ज ६१ कोटी ७९ लाख ८२ हजार रुपये) इतके होणार आहे. या घसघशीत पगारवाढीमुळे पिचाई आता जगातील सर्वाधिक पगार घेणाऱ्या दिग्गज सीईओंपैकी एक ठरले आहेत, असे वृत्त 'फायनान्शियल टाईम्स'ने दिले आहे.

पिचाई यांना एवढा पगार कसा मिळतो?

मूळचे भारतीय असणाऱ्या सुंदर पिचाई यांच्या पगारवाढीचे गणित कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून आहे. गुगलने (अल्फाबेट) शेअर बाजारात 'S&P 100' इंडेक्सच्या तुलनेत चांगली कामगिरी केली, तर सुंदर पिचाई यांना मिळणारे उत्पन्न दुप्पट होऊन २५२ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. मात्र, कंपनीने ठरवलेले लक्ष्य गाठले नाही, तर त्यांना यातील काहीही मिळणार नाही, हेही महत्त्वाचे आहे. याशिवाय, पिचाई यांना दरवर्षी २ दशलक्ष डॉलर्स पगार मिळेल आणि पुढील तीन वर्षांत दरमहा ८४ दशलक्ष डॉलर्स किमतीचे शेअर्स (स्टॉक वेस्टिंग) टप्प्याटप्प्याने दिले जातील. इतकेच नाही तर, गुगलच्या स्वायत्त प्रकल्पांच्या प्रगतीवर आधारित आणखी ३५० दशलक्ष डॉलर्सचे 'स्टॉक इन्सेंटिव्ह' देखील त्यांना दिले जाणार असल्याचेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

पिचाई यांच्या नेतृत्वावर कंपनीचा पूर्ण विश्वास

अहवालानुसार, गुगलच्या सीईओंना 'वेमो' (Waymo) कंपनीचे १३० दशलक्ष डॉलर्सचे आणि 'विंग एव्हिएशन'चे ४५ दशलक्ष डॉलर्सचे शेअर्स मिळणार आहेत. जर या कंपन्यांनी चांगली कामगिरी केली, तर या शेअर्सची किंमत त्यांच्या मूळ मूल्याच्या तुलनेत २०० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. अल्फाबेट कंपनीच्या बोर्डाने म्हटले आहे की, सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वावर कंपनीचा पूर्ण विश्वास आहे. स्वायत्त ड्रायव्हिंग (विनाचालक कार) आणि आधुनिक डिलिव्हरी सिस्टीम यांसारख्या उपक्रमांत असणाऱ्या मोठ्या आव्हानांना ते अत्यंत सक्षमपणे सामोरे गेले आहेत.

पिचाई सीईओ झाल्यापासून गुगलच्या भांडवलात तब्बल सातपट वाढ

सुंदर पिचाई हे २००४ मध्ये गुगलमध्ये रुजू झाले. गुगल क्रोम विकसित करण्यात आणि अँड्रॉइड सिस्टीमचे नेतृत्व करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ऑगस्ट २०१५ मध्ये त्यांची गुगलच्या सीईओपदी नियुक्ती झाली. तेव्हापासून त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने लक्षणीय प्रगती केली आहे. २०१५ मध्ये गुगलचे बाजारमूल्य ५३५ अब्ज डॉलर्स इतके होते, जे आता वाढून ३.६ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, जानेवारीमध्ये हे मूल्य तब्बल ४ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत गेले होते, म्हणजेच त्यांच्या काळात कंपनीच्या मूल्यात सात पटीने वाढ झाली आहे.

पिचाई यांच्या पत्नींकडे गुगलचे १६.७ लाख शेअर्स

या आठवड्याच्या सुरुवातीला सुंदर पिचाई यांनी गुगलचे ३२,५०० 'क्लास सी' शेअर्स विकले, ज्यांची किंमत सुमारे ९.८ दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. रिपोर्टनुसार, त्यांच्या पत्नींकडेही गुगलचे १६.७ लाख शेअर्स आहेत. शुक्रवारी शेअर बाजारात एका शेअरची किंमत २९८ डॉलर्सवर बंद झाली, त्यानुसार त्यांच्या पत्नींच्या शेअर्सचे एकूण मूल्य तब्बल ४९८ दशलक्ष डॉलर्स इतके आहे. इतर दिग्गज कंपन्यांच्या तुलनेत पाहिले तर, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी २०२५ आर्थिक वर्षात ९६.५ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. तर, ॲपलचे प्रमुख टिम कुक यांनी ७४.३ दशलक्ष डॉलर्स इतके मानधन मिळवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT