

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात ‘असामान्य झेप’ घेण्यास सज्ज असल्याचे सांगत, देशाच्या एआय परिवर्तनात भागीदारी करण्याची गुगलची ठाम भूमिका स्पष्ट केली. “एआय हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा तांत्रिक बदल आहे,” असे सुंदर पिचाई यांनी बुधवारी सांगितले. पिचाई यांनी सांगितले की, एआयमुळे आरोग्य निदान सुधारण्यापासून शेतकर्यांना रिअल-टाईम सूचना देण्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर बदल घडवता येऊ शकतात. भारतातील विविध भाषा, सांस्कृतिक विविधता आणि मजबूत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा या नवकल्पनांसाठी भक्कम पाया असल्याचे त्यांनी नमूद केले.
एआयचा स्वीकार करताना विश्वास, सुरक्षितता आणि सर्वसमावेशकता यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे पिचाई यांनी स्पष्ट केले. “एआय सर्व भाषांमध्ये आणि स्थानिक गरजांनुसार कार्य करायला हवा. तंत्रज्ञान पारदर्शक आणि जबाबदार असेल तरच लोकांचा विश्वास वाढेल,” असे ते म्हणाले.
याशिवाय, गुगलने भारतात 15 अब्ज डॉलर्सच्या एआय हबची घोषणा केली असून, त्यामध्ये गिगावॉट-स्तरीय संगणकीय सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सबसी केबल गेटवे उभारले जाणार आहेत. इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये ‘ गुगल एआय प्रोफेशनल सर्टिफिकेट प्रोग्रॅम’ सुरू करून विद्यार्थ्यांना आणि युवा व्यावसायिकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पिचाई यांनी ‘इंडिया-अमेरिका कनेक्ट इनिशिएटिव्ह’ची घोषणा केली. या प्रकल्पांतर्गत अमेरिका, भारत आणि दक्षिण गोलार्धातील इतर देशांना जोडणार्या नवीन सबसी केबल मार्गांची उभारणी केली जाणार आहे. यामुळे एआय कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.
1. भारत एआय क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडी घेण्यास सज्ज
2. आरोग्य, शेती आणि प्रशासनात एआयचा व्यापक वापर होणार
3. 15 अब्ज डॉलर्सचा एआय हब आणि नवीन सबसी केबल प्रकल्प जाहीर
4. विद्यार्थी, सरकारी कर्मचार्यांसाठी व्यापक कौशल्यविकास कार्यक्रम