Spain train accident: दक्षिण स्पेनमध्ये दोन वेगवान गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात किमान २० जणांचा मृत्यू झाला असून ७३ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ही दुर्घटना कॉर्डोबा प्रांतातील आदमुजजवळ घडली, ज्यामुळे माद्रिद आणि अंदालुसिया दरम्यानची रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालागा येथून माद्रिदला जाणारी एक ट्रेन रुळावरून घसरली आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनला धडकली. दोन्ही गाड्यांमध्ये मिळून सुमारे ५०० प्रवासी होते.
मालागा आणि माद्रिद दरम्यान धावणारी ट्रेन रुळावरून घसरली आणि माद्रिदहून दक्षिण स्पेनमधील हुआल्वा शहराकडे जाणाऱ्या ट्रेनला धडकली. या धडकेत २० जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक लोक अजूनही डब्यांमध्ये अडकले आहेत. बचाव कार्य वेगाने सुरू असून आपत्कालीन पथके घटनास्थळी तैनात आहेत. अपघातानंतर माद्रिदच्या रुग्णालयांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ७३ जखमी प्रवाशांना सहा वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातानंतर माद्रिद आणि अंदालुसिया दरम्यानची हाय-स्पीड रेल्वे सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून मार्गावरील सर्व गाड्यांना त्यांच्या सुरुवातीच्या स्थानकावर परत पाठवण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेड क्रॉसने कॉर्डोबा येथून रुग्णवाहिका आणि जैन येथून अतिरिक्त तीन रुग्णवाहिका पाठवल्या आहेत. तसेच दोन्ही गाड्यांमधील प्रवाशांसाठी जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करण्यात आली आहे.