South Korean Navy Plane Crashes
दक्षिण कोरियाच्या पोहांग शहरातील लष्करी तळाजवळ गुरुवारी दक्षिण कोरियाच्या नौदलाचे विमान प्रशिक्षण उड्डाणादरम्यान कोसळले. या विमानातून चार जण प्रवास करत होते, असे वृत्त आहे. या घटनेनंतर घटनास्थळी डोंगरांमधून धुराचे मोठे लोट पाहायला मिळाले आहेत.
हे दुर्घटनाग्रस्त विमान पी-३ असल्याची पुष्टी दक्षिण कोरियाच्या नौदलाने केली आहे. दक्षिण कोरियातील योनहाप वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी आग विझवण्याचे काम करत आहेत. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर त्याला आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नौदलाकडून अद्याप अपघाताचे कारण आणि जीवितहानीबाबत काही स्पष्ट करण्यात आलेले नाही.
नौदलाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, पी-३सी या विमानाने पोहांग येथील तळावरून दुपारी १:४३ वाजता उड्डाण केले होते. त्यानंतर ते कोसळले.
डिसेंबरमध्ये दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेजू एअरचे प्रवासी विमान कोसळले होते. या दुर्घटनेत १७९ जणांचा मृत्यू झाला होता. तर दोघे बचावले होते. ही घटना दक्षिण कोरियाच्या विमान वाहतूक इतिहासातील सर्वात जीवघेण्या अपघातांपैकी एक होती.