Soham Parekh Pudhari
आंतरराष्ट्रीय

Soham Parekh | सिलिकॉन व्हॅली हादरली! टेक इंडस्ट्रीत खळबळ; भारतीय टेक्नोक्रॅट सोहम पारेख का आहे चर्चेत?

Soham Parekh moonlighting | एकाचवेळी अनेक स्टार्टअप्समध्ये नोकरी; सोशल मीडियात चर्चेला उधाण, मीम्स व्हायरल

Akshay Nirmale

Indian engineer Soham Parekh moonlighting controversy multiple startups fraud Silicon Valley scandal YC startup scam fake resume

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोहम पारेख हे नाव सध्या संपूर्ण टेक इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. कारण त्याच्यावर अमेरिकेतील अनेक स्टार्टअप्सना एकाच वेळी फसवून नोकरी करण्याचे गंभीर आरोप झाले आहेत.

हे प्रकरण केवळ नोकरीच्या फसवणुकीपुरते मर्यादित नाही, तर त्यातून रिमोट वर्क, स्टार्टअप संस्कृती, नैतिकता आणि हायरिंग प्रक्रियेतील त्रुटी यांचाही मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या भारतीय सॉफ्टवेअर अभियंता सोहम पारेख याच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाने भारतातील आणि अमेरिकेतील टेक इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.

वादाची सुरुवात

Mixpanel या प्रसिद्ध टेक कंपनीचे संस्थापक सुहैल दोशी यांनी X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडियावर एक धक्कादायक पोस्ट करत इतर उद्योजकांना सोहम पारेखपासून सावध राहण्याचा इशारा दिला. त्यांनी पारेखचा रेझ्युमेही शेअर करत त्यातील सुमारे 90 टक्के माहिती बनावट असल्याचा दावा केला.

सुहैल दोशी यांच्या या पोस्टनंतर सिलिकॉन व्हॅलीतील इतर अनेक संस्थापक, अभियंते आणि हायरिंग मॅनेजर्सनीही पारेखवर अशाच प्रकारचे अनुभव शेअर करत आरोपांची मालिका सुरू केली.

पारेखवर आरोप आहे की त्यांनी अनेक स्टार्टअप्समध्ये एकाच वेळी नोकरी केली आणि कामाच्या जबाबदाऱ्या इतर कनिष्ठ डेव्हलपर्सकडे ढकलल्या.

कोण आहे सोहम पारेख?

सोहम पारेख हा मूळचा भारतातील असून त्याने मुंबई विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी मध्ये पदवी (2020) आणि जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून संगणक विज्ञानातील पदव्युत्तर शिक्षण (2022) घेतल्याचा दावा त्यांच्या रेझ्युमेमध्ये करण्यात आला आहे.

मात्र, हे शैक्षणिक तपशील सध्या सत्यतेच्या तपासणीखाली आहेत.

दरम्यान, अनेक सहकाऱ्यांनी पारेखच्या तांत्रिक कौशल्यांची स्तुती केली असून, त्याला “एका तासात काम पूर्ण करणारा” इंजिनिअर म्हणून ओळखले जाते. मात्र, आरोपानुसार त्याने हे कौशल्य चुकीच्या मार्गाने वापरले.

अनेक स्टार्टअप्समध्ये पूर्णवेळ नोकरी करत असल्याचे भासवत, त्याने एकाच वेळी अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या आणि त्याचे कोणतेही खुलासे न करता काम न केल्याचेही अनेक वेळा निदर्शनास आले आहे.

सोहमचा कथित व्यावसायिक अनुभव

पारेखने खालील स्टार्टअप्समध्ये काम केल्याचे त्यांच्या रेझ्युमेमध्ये नमूद केले आहे-

  • Dynamo AI – सीनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर (2024 पासून)

  • Union.ai – सीनियर फुलस्टॅक इंजिनिअर (2023–2024)

  • Synthesia – सीनियर फुलस्टॅक इंजिनिअर (2021–2022)

  • Alan AI – फाउंडिंग इंजिनिअर (2021)

  • GitHub – ओपन सोर्स फेलो (2020)

याशिवाय Antimetal, Fleet AI, Mosaic या स्टार्टअप्सशीही त्यांचा संबंध असल्याचे समोर आले आहे. अनेक स्टार्टअप्सचे प्रमुख, जसे की Matthew Parkhurst (Antimetal) आणि Michelle Lim (Warp) यांनीही पारेखला कामावर घेतल्याचे कबूल केले आहे.

सोशल मीडियावरील चर्चेला उधाण, मीम्स व्हायरल...

X वरील पोस्ट्सवर यावर प्रचंड चर्चा सुरू असून, काही लोकांनी पारेखला "कॉर्पोरेट मजदूर ज्याने सिस्टम हॅक केला" असे म्हणत स्तुती केली आहे.

दुसरीकडे, अनेकांनी त्यांच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच्यावर आधारित मीम्सही व्हायरल होत असून, काहीजण त्याला "The Wolf of YC Street" म्हणत आहेत.

खुद्द LinkedIn चे सीईओ Reid Hoffman यांनीही या वादावर विनोदी टिप्पणी करत चर्चेत उडी घेतली आहे. "What do you think Soham Parekh's LinkedIn header is?" असा गमतीशीर सवाल त्यांनी केला आहे.

सोहम पारेख प्रकरणाने सध्या स्टार्टअप जगतातील भरवशाच्या भरती प्रक्रियेवर आणि रिमोट वर्कच्या युगातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ही घटना केवळ वैयक्तिक फसवणूक नसून, ती संपुर्ण टेक इंडस्ट्रीसाठी एक इशारा ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT