पुढारी ऑनलाईन डेस्क: युरोपातील बहुतांश देशांमधील तुरूंगात कैद्यांनाही विविध मानवाधिकार मंजूर केले गेलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे आधीच परवान्याने दिल्या जात असलेल्या ‘वैवाहिक भेटी’ (Conjugal Visits).
हे लक्षात घेऊन इटलीने देखील कैद्यांसाठी शुक्रवारी खास ‘सेक्स रूम’ सुरू केली आहे. त्या दिवशी एका कैद्याला त्याच्या महिला जोडीदारासोबत या खास खोलीत भेट घेण्याची परवानगी देण्यात आली.
इटलीच्या मध्य भागातील उम्ब्रिया राज्यातील तुरुंगात सुरू झालेल्या या सुविधेमुळे, कैद्यांना त्यांच्या पती-पत्नी किंवा जोडीदारांसोबत खाजगी वेळ घालवण्याची कायदेशीर संधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे, इटलीच्या घटनात्मक न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामध्ये न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, कैद्यांना बाहेरून भेट देणाऱ्या जोडीदारांसोबत ‘खाजगी भेटी’ घेण्याचा मूलभूत हक्क आहे.
मानवाधिकार, मानसिक आरोग्य आणि तुरुंगातील सुधारणा या त्रिसूत्रीला आधार देणारा इटलीच्या या निर्णयाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे.
उम्ब्रिया राज्यातील कैद्यांच्या हक्कांचे लोकपाल ज्युझेपे काफोरिओ यांनी ANSA वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.
टर्नी येथील तुरुंगात झालेल्या या पहिल्या खाजगी भेटीविषयी ते म्हणाले, "सर्वकाही सुरळीत पार पडले याचा आनंद आहे, पण या प्रक्रियेत सहभागी असलेल्या व्यक्तींच्या गोपनीयतेचे पूर्णतः रक्षण करणे आवश्यक आहे. ही एकप्रकारे चाचणी होती आणि ती यशस्वी ठरली. पुढील काही दिवसांत अशा आणखी भेटी घडतील."
2024 च्या जानेवारीत दिलेल्या निर्णयात, न्यायालयाने नमूद केले होते की, कैद्यांना त्यांच्या पती, पत्नी किंवा दीर्घकालीन जोडीदारांसोबत कोणत्याही सुरक्षा रक्षकाच्या उपस्थितीशिवाय, खाजगी वेळ घालवण्याचा अधिकार असावा.
या निर्णयात असंही नमूद केलं होतं की, युरोपातील फ्रान्स, जर्मनी, स्पेन, नेदरलँड्स, स्वीडन इत्यादी देशांमध्ये अशा वैवाहिक भेटी पूर्वीपासूनच परवान्याने दिल्या जात आहेत.
गेल्या आठवड्यात न्याय मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली, ज्यात स्पष्ट करण्यात आलं की, खाजगी भेटीसाठी पात्र ठरलेल्या कैद्यांना बेड आणि टॉयलेट असलेल्या स्वतंत्र खोलीचा दोन तासांचा वापर करता येईल.
तिथे इतर कुणी असणार नाही मात्र मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्या खोलीचा दरवाजा बंद न करता उघडा ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून गरज भासल्यास सुरक्षा रक्षक हस्तक्षेप करू शकतील.
इटलीत 62000 कैदी
सध्या इटलीमधील तुरुंगांमध्ये युरोपात सर्वाधिक कैदी आहेत आणि अलीकडच्या काळात कैद्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार सध्या इटलीत 62000 हून अधिक कैदी आहेत, जे तुरुंगांच्या अधिकृत क्षमतेच्या 21 टक्के जास्त आहेत.
नातेसंबंध टिकवण्यासाठी एक पाऊल – दीर्घ शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना जोडीदाराशी संपर्कात राहणं नात्यांची वीण मजबूत करतं.
इटलीच्या घटनात्मक न्यायालयाने कैद्यांना “वैयक्तिक व खाजगी भेटी” घेण्याचा हक्क दिला, हे मानवाधिकारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे.
मानवाधिकारांचा आदर – तुरुंगात असूनही माणसाच्या नैसर्गिक गरजा व अधिकार यांना न्याय मिळायला हवा, हे न्यायालय मान्य करतं.
संविधानिक न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय – 2024 च्या जानेवारीत आलेला निर्णय एक क्रांतिकारक टप्पा मानला जातो.
कैद म्हणजे केवळ शिक्षा नव्हे, तर पुनर्वसनाची संधी असते. कैद्याच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं ही तुरुंग प्रशासनाची जबाबदारी असते. वैयक्तिक व भावनिक गरजा पूर्ण न झाल्यास तणाव, नैराश्य, किंवा आक्रमक वर्तन वाढू शकतं.
भावनिक स्थैर्य मिळवण्यासाठी गरजेचं पाऊल – जोडीदाराशी संपर्क राहिल्याने एक मानसिक आधार मिळतो.
इटलीच्या तुरुंगांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत असल्याने हे उपाय सकारात्मक ठरू शकतात.
नात्यांमध्ये गुंतलेपण मानसिकदृष्ट्या स्थिरता देते, जे दीर्घकाळ तुरुंगात राहणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरते.