Cory Booker Longest Speech:  
आंतरराष्ट्रीय

सिनेटमध्ये घडला इतिहास! कोरी बुकर यांचे सलग 25 तास भाषण; नेमके काय घडले? जाणून घ्या

Cory Booker Longest Speech: सोमवारी संध्याकाळी सुरू केलेले भाषण मंगळवारी रात्री संपले

Akshay Nirmale

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेची संसद सिनेटमध्ये आत्तापर्यंतच्या सर्वाधिक लांबीच्या भाषणाचा विक्रम नोंदला गेला आहे. हे भाषण थोडेथोडके नव्हे तर अखंड 25 तास 5 मिनिटे इतक्या लांबीचे झाले आहे. त्यामुळे सिनेटमध्ये सर्वाधिक लांबीचे भाषण म्हणून या भाषणाने विक्रम प्रस्थापित केला आहे.

न्यू जर्सीचे डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर कोरी बुकर यांनी सिनेटमध्ये उभे राहून हे ऐतिहासिक भाषण केले आहे. त्यांनी या संपूर्ण भाषणात ट्रम्प प्रशासनाच्या कारभाराची लक्तरे काढत ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

सोमवार संध्याकाळपासून मंगळवार रात्रीपर्यंत

कोरी बुकर यांनी सोमवारी संध्याकाळी 6.59 वाजता भाषण सुरू केले आणि मंगळवारी रात्री 8.05 वाजता ते संपवले. कोरी बुकर म्हणाले की, जोपर्यंत मी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे तोपर्यंत अमेरिकन सिनेटचे नियमित कामकाज विस्कळीत करण्याचा माझा हेतू आहे. कारण मला डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांचा विरोध करायचा आहे.

डेमोक्रॅटिक सहकाऱ्यांचा पाठिंबा

बुकर यांना या ऐतिहासिक भाषणादरम्यान त्यांच्या डझनभर डेमोक्रॅटिक सहकाऱ्यांनी साथ दिली. सिनेट माइनॉरिटी लीडर चक शुमर, सिनेटर ख्रिस मर्फी, एमी क्लोबुचर, मेझी हिरोनो आणि डिक डर्बिन यांनी बुकर यांच्याजवळ जाऊन त्यांनी बुकर यांच्यासोबत संवाद साधून त्यांना थोडा वेळ विश्रांती मिळेल असे पाहिले.

डेमोक्रॅटिक पक्षाचे हाउस माइनॉरिटी लीडर हकीम जेफ्रीस आणि काँग्रेस ब्लॅक कॉकसच्या सदस्यांनीही बुकर यांचे भाषण ऐकण्यासाठी सिनेट कक्षात उपस्थिती दर्शवली. बुकर यांचे चुलतभाऊ, भाऊ आणि डेमोक्रॅटिक सहाय्यक यावेळी गॅलरीत उपस्थित होते.

सलग 25 तास उभे राहून भाषण

सिनेटच्या नियमांनुसार, एक सिनेटर सतत उभा राहूनच बोलत राहिला पाहिजे. तो सिनेट कक्षाबाहेर जाऊ शकत नाही, विश्रांती घेऊ शकत नाही किंवा शौचालयास जाऊ शकत नाही. बुकर यांनी या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले.

भाषणावेळी काही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी भाषणाच्या काही दिवस आधी उपवास केला होता आणि भाषणाच्या आदल्या रात्रीदेखील द्रवपदार्थ पिणे थांबवले होते.

रात्रीच्या वेळी बुकर, अध्यक्षता करणारे अधिकारी, काही लिपिक आणि सुरक्षा कर्मचारी वगळता संपूर्ण सिनेट रिकामी होती. सिनेट स्टाफ आणि कॅपिटल पोलिस यांना त्याच्या भाषणाच्या संपूर्ण कालावधीत आपापल्या जागांवर तैनात राहावे लागले. काही डेमोक्रॅट सिनेटरांनी मधूनच प्रश्न विचारून बुकर यांना थोडा वेळ सावरायला मदत केली.

शारीरिक थकव्यावर मात

बुकर हे उभे राहून भाषण करताना वजनाचा भार पडू नये म्हणून सतत हालचाल करत होते. काहीवेळी स्टँडवर हात टेकवून त्यांनी भाषण दिले. आपल्या नोट्सच्या जाड फायलीतून ते भाषण वाचत राहिले.

त्यांनी ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण, मेडिकेअरवरील संभाव्य कपात, तसेच ट्रम्प यांचे सल्लागार एलन मस्क यांच्या सरकारी कार्यक्षमता धोरणांविषयी भाष्य केले. वांशिक न्याय, मतदान हक्क आणि आर्थिक असमानता यावरही त्यांनी भाष्य केले. विशेषतः ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांचा दुर्लक्षित समुदायांवर होणाऱ्या परिणामांवर त्यांनी भर दिला.

सात दशकांचा 24 तास भाषणाचा विक्रम मोडला

दरम्यान, यापुर्वी 1957 मध्ये दिवंगत सिनेटर स्ट्रोम थर्मंड यांनी 24 तास 18 मिनिटांच्या फिलिबस्टरचा विक्रम मोडला. थर्मंड यांनी नागरिक हक्क विधेयक रोखण्यासाठी ते भाषण दिले होते. 1957 मध्ये थर्मंड यांनी त्यांच्या फिलिबस्टर दरम्यान एका विश्रांतीसाठी सिनेट सोडले होते, पण बुकर यांनी संपूर्ण 25 तास सिनेटमध्ये घालवले.

रेकॉर्ड मोडण्याच्या काही वेळ आधी बुकर यांनी विनोद करत सांगितले की, "आता मला थांबावे लागेल, कारण काही नैसर्गिक गरजा पूर्ण करायच्या आहेत!" पण त्यांनी आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही आणि आपले भाषण पूर्ण ताकदीने सुरू ठेवले.

इतिहासातील सर्वात लांब भाषणांमध्ये समावेश

बुकर यांचे भाषण सिनेटच्या दीर्घ भाषणांत सामिल झाले आहे. 2013 मध्ये सिनेटर टेड क्रूझ यांनी 21 तास ओबामा केअर विरोधात भाषण दिले होते, तर 2010 मध्ये सिनेटर बर्नी सॅंडर्स यांनी 8.5 तास भाषण दिले होते.

फिलिबस्टर नसूनही प्रभावी भाषण

बुकर यांचे भाषण तांत्रिकदृष्ट्या फिलिबस्टर नव्हते, कारण ते कोणतेही विधेयक थांबवण्याच्या उद्देशाने नव्हते. फिलिबस्टर म्हणजे एखादे विधेयकाला विरोध करण्यासाठी, त्याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी, सत्ताधारी पक्षाला विधेयकात बदल करण्याबाबत दबाव टाकण्यासाठी जी भाषणे सिनेटमध्ये केली जातात त्यांना फिलिबस्टर म्हणतात.

तथापि, बुकर यांच्या या भाषणाने सिनेटचे कामकाज विलंबित झाले. याचा परिणाम NATO साठी अमेरिकन राजदूत म्हणून मॅथ्यू व्हिटेकर यांच्या नियुक्तीवरील मतदान आणि ट्रम्प यांचे शुल्क प्रस्ताव रोखण्याच्या डेमोक्रॅटिक प्रयत्नांवरही झाला.

प्रशंसा आणि टीका

डेमोक्रॅटिक नेत्यांनी बुकर यांच्या सहनशक्तीचे कौतुक केले. चक शुमर यांनी "अतिशय अद्भुत" असे याचे वर्णन केले तर NAACP अध्यक्ष डेरेक जॉन्सन यांनी हे एक साहसी कृत्यू असल्याचे म्हटले.

तथापि, काही रिपब्लिकन सिनेटरांनी मात्र हा प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा स्टंट आहे, असे म्हटले. सिनेटर जॉन कॉर्निन यांनी याला नाटकी आणि ज्याचा विधायक परिणाम होणार नाही, असे म्हटले आहे.

आपले पूर्वज गुलाम आणि गुलामधारक दोन्हींचे वंशज असल्याचे त्यांनी खुलेपणाने सांगितले. दरम्यान, बुकर यांचे भाषण संपूर्ण अमेरिकेत हजारो लोकांनी ऐकले. बुकर यांच्या सिनेट यूट्यूब पेजवर, तसेच इतर लाइव्ह स्ट्रीमवरही अनेकांनी हे भाषण ऐकले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT