पुढारी ऑनलाईन डेस्क : इजिप्तमधील प्राचीन पिरॅमिड, ममी आणि स्फिंक्स जगासाठी आजही आश्चर्च बनून राहिलेली आहेत. जगभरातील संशोधक येथे कार्यरत असतात, आणि सातत्याने इजिप्तच्या प्राचीन इतिहासाबद्दल नवनवीन माहिती जगासमोर येत असते. विशेषतः इजिप्तमधील ममींबद्दल नियमित संशोधन कार्य सुरू असते. या ममींबद्दल इतिहासप्रेमींच नेहमीच कुतूहल दिसून आलेले आहे. या ममींवर आधारित हॉलिवूड सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरील कामगिरी हीच बाब अधोरेखित करतात.
इजिप्तमध्ये ज्या ममी आढळल्या आहेत, त्यातील एक ममी आहे ती किंचाळणाऱ्या स्त्रीची. ही ममी १९३५मध्ये इजिप्तमधील लक्जोर येथील दैर अल-बहरी येथे उत्खननामध्ये सापडली होती. ही ममी तेव्हा आणि अगदी आजही जगासाठी एक आश्चर्च बनून राहिली आहे. याचे कारण म्हणजे या ममीच्या चेहऱ्यावरील भाव. ही ममी किंचाळताना दिसते. तिच्या चेहऱ्यावर भीतीचे हे भाव कसे आले असतील, मृत्यूवेळी तिला काही यातना झाल्या असतील का, अत्याचारांमुळे तिचा मृत्यू झाला असेल का, असे अनेक प्रश्न या ममीमुळे निर्माण झाले होते. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिलेली आहे.
पण कैरो विद्यापीठातील संशोधकांनी या ममीवर आता पूर्ण अभ्यास केला असून तिचा चेहरा 'किंचाळणारा' का आहे, याचे उत्तर शोधले आहे. या ममीचे योग्य पद्धतीने सिटी स्कॅन केल्यानंतर संशोधकांनी काही निष्कर्ष काढले आहेत.
प्राध्यापक सहर सलीम यांनी हे संशोधन केले आहे. मृत्यूच्या वेळी या महिलेत स्नायूंचे काठिण्य (Muscular Stiffening) निर्माण झाले याला वैद्यकीय भाषेत Cadaveric Spasm असे म्हणतात. हा प्रकार मृत्यू येताना घडतो, आणि मृत्यूनंतर चेहऱ्यावरील हे अस्वस्थ भाव तसेच राहतात.
या महिलेचे वय मृत्यू वेळी ४८ वर्षांचे होते, आणि तिला सौम्य स्वरूपाचा संधिवात होता, तसेच तिचे काही दात पडले होते, असे निष्कर्षही काढण्यात आले आहेत. जवळपास ३ हजार ५०० वर्षांपूर्वी ही ममी बनवल्यात आली होती.
सलिम म्हणाले, "जे लोक मृतदेहाची ममी बनवत असत, त्यांची अशी भावना असे की ममी बनवण्याची प्रक्रिया केल्यानंतरही मृतदेह सुंदर दिसला पाहिजे. मृत्यूलोकासाठीची ही तयारी असायची. मृतदेहाचा जबडा खाली लोंबू नये म्हणून तो बांधण्याची पद्धत होती." या ममीत सोने आणि चांदीची अंगठी, केसांचा विग मिळाले आहेत, त्यामुळे ममी बनवताना काही हलगर्जीपणा होण्याची शक्यता नाही, असे ते म्हणाले.
ही ममी एका लाकडी कॉफिनमध्ये मिळून आली होती. या कबरीला टोंब ऑफ सेनमट असे म्हटले जाते. सेनमट हा प्राचीन काळात इजिप्तमध्ये आर्किटेक्ट होता आणि तो राजघराण्याच्या बांधकामाचे काम पाहात होता. ही ममी ज्या महिलेची आहे, ती सेनमटच्या जवळच्या नातलगांपैकी असावी आणि तिचा सामाजिक दर्जा चांगला असावा असे म्हटले जाते.