Russia Ukraine War latest update Russia attack with 537 arial weapons 477 drones and 60 missile used
नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर एका रात्रीत 537 हवाई हत्यारांचा मारा करत युद्धाच्या सुरुवातीपासूनचा सर्वात मोठा हल्ला केला आहे, अशी माहिती युक्रेनच्या हवाई दलाने दिली.
या हल्ल्यात 477 ड्रोन आणि डिकोय (फसवणारे यंत्र) तसेच 60 क्षेपणास्त्रांचा समावेश होता. त्यापैकी 249 हत्यारे पाडण्यात यश आलं, तर 226 हत्यारे हरवली, जी कदाचित इलेक्ट्रॉनिक जॅमिंगमुळे निष्क्रिय झाली असावीत.
युक्रेनच्या हवाई दलाचे प्रमुख प्रवक्ते युरी इह्नात यांनी ‘Associated Press’ ला दिलेल्या माहितीनुसार “ही हल्ल्याची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई होती. यामध्ये विविध प्रकारच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा समावेश होता आणि हल्ल्याचे उद्दिष्ट युक्रेनच्या विविध भागांवर, अगदी पश्चिम युक्रेनसुद्धा होते जे प्रत्यक्ष युद्धाच्या रेषेपासून खूप दूर आहे.
या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये नव्याने अस्थैर्य पसरले असून, शेजारील देश पोलंड आणि त्यांच्या सहयोगी देशांनी आपले लढाऊ विमान उड्डाणात ठेवले, जेणेकरून पोलिश हवाई हद्दीची सुरक्षितता कायम राहील, असे पोलंडच्या हवाई दलाने स्पष्ट केले.
खेरसॉनमध्ये एका ड्रोन हल्ल्यात एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्रांतीय गव्हर्नर ऑलेक्झांडर प्रोकुडीने दिली.
चेरकासी प्रांतात सहा नागरिक जखमी झाले आहेत, त्यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे, अशी माहिती गव्हर्नर इहोर टाबुरेट्स यांनी दिली.
हा ताजा हल्ला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इस्तंबूलमध्ये थेट शांतता चर्चेसाठी तयारी दर्शवल्यानंतर झाला. मात्र, युद्ध चौथ्या वर्षात पदार्पण करत असताना कुठल्याही शांतता प्रयत्नांना यश आलेले नाही.
इस्तंबूलमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यात नुकत्याच झालेल्या दोन बैठका अपयशी ठरल्या आणि कोणताही ठोस निर्णय घेता आला नाही.
या युद्धात दोन्ही देशांनी लांब पल्ल्याचे ड्रोन हल्ले मोठ्या प्रमाणावर वापरले आहेत. या हल्ल्यांमुळे युद्ध एक प्रयोगशाळा बनले आहे जिथे नव्या तंत्रज्ञानाचे व घातक शस्त्रांचे चाचणीकरण केले जात आहे.
रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला फक्त युद्धाच्या तीव्रतेचे नव्हे तर संभाव्य राजनैतिक अपयशाचेही निदर्शक आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न वाढविण्याची आणि द्विपक्षीय संवादाला नवे दिशा देण्याची ही वेळ आहे.