Russia Ukraine Drone Attack
मॉस्को : रशियाने पुन्हा एकदा यूक्रेनवर मोठा हवाई हल्ला चढवत, 85 'शाहेद' प्रकारचे ड्रोन आणि एक इस्कंदर-M बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले. हा हल्ला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अलास्का येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर केवळ काही तासांतच करण्यात आला.
यूक्रेनच्या हवाई दलाच्या माहितीनुसार, हा हल्ला 15 ऑगस्टच्या संध्याकाळपासून 16 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत सुरू होता. युक्रेनमधील अनेक भाग, विशेषतः सीमेवरच्या संघर्षप्रवण भागांना लक्ष्य करण्यात आले.
यूक्रेनने सांगितले की त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने 85 पैकी 61 ड्रोन पाडण्यात यश मिळवले. मात्र काही ड्रोन टाळता आले नाहीत आणि त्यांनी विविध भागांमध्ये नुकसान केले.
या हवाई हल्ल्याबरोबरच रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने डोनेत्स्कमधील कोलोदियाझी गाव आणि डनिप्रोपेत्रोव्ह्स्क भागातील वोरोने गावाचा ताबा घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, युक्रेनशी संबंधित निरीक्षण संस्थांनी सांगितले की रशियन सैन्य अजूनही वोरोने गावाच्या काही अंतरावर आहे.
हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा अलास्कामध्ये पुतिन आणि ट्रम्प यांच्यात युध्द थांबवण्यासाठीची बैठक झाली होती. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी शांततेकडे वाटचाल करण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र कोणताही ठोस तह किंवा युद्धविराम झाला नाही.
गुप्त बैठकीच्या तपशीलांची माहिती एका हॉटेलच्या प्रिंटरवर सापडल्याने राजनैतिक वर्तुळात खळबळ उडाली होती, ज्यामध्ये मेनू, भेटवस्तूंची माहिती आणि जागांची यादी होती.
फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाला आता तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात हजारो लोकांचा मृत्यू झाला असून, लाखो नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. रशियाचे अजूनही पूर्व आणि दक्षिण युक्रेनमधील मोठ्या भूभागांवर नियंत्रण आहे.