पुढारी ऑनलाईन डेस्क : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे मंगळवारी (९ ऑक्टोबर) निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल जगभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. टाटा यांच्या निधनाबद्दल मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी शोक व्यक्त केला आहे. "येणाऱ्या अनेक वर्षांत त्यांच्या नसण्याची जाणीव आपल्याला होत राहील. पण मला माहिती आहे, त्यांनी जो वारसा आणि जी उदाहरणे मागे ठेवली आहेत, ती येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील."
गेट्स यांनि लिक्डइनवर टाटा यांच्याबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात, "रतन टाटा दूरदृष्टी असणारे नेते होते. लोकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी ते अविरत कार्यरत होते. त्यांच्या समर्पित वृत्तीने भारतावर आणि जगावर मोठा ठसा उमटवला आहे."
अनेक वेळा त्यांना भेटण्याचे भाग्य मला लाभले आहे. मानवतेसाठी ज्या ध्येयाने ते कार्यरत होते, त्य़ामुळे प्रत्येक भेटीत मी भारावून जात होतो. लोकांनी आरोग्यदायी आणि समृद्ध जीवन जगावे यासाठी वेगवेगळ्या उपक्रमात आम्ही एकत्र काम केले आहे, असे ही गेट्स यांनी म्हटले आहे.