Who Is Balen Shah Nepal PM Pudhari
आंतरराष्ट्रीय

Who Is Balen Shah: रॅपर ते पंतप्रधान... 35व्या वर्षी नेपाळचे पंतप्रधान झालेले बालेन शाह कोण आहेत? भन्नाट प्रवास

Balen Shah Nepal PM: बालेन शाह वयाच्या 35 व्या वर्षी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. तरुणांच्या आंदोलनानंतर त्यांच्या पक्षाला बहुमत मिळालं आणि सत्ता बदलली.

पुढारी वृत्तसेवा

Who Is Balen Shah Nepal Youngest Prime Minister Profile India Connection: नेपाळच्या राजकारणात मोठा बदल घडवत बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी देशाची सूत्रे हाती घेत त्यांनी इतिहास रचला आहे. रामचंद्र पौडेल यांनी संविधानातील कलम 76(1) अंतर्गत त्यांची नियुक्ती केली.

आंदोलनानंतर सत्तांतर

नेपाळमध्ये गेल्या काही महिन्यांत तरुणांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले होते. भ्रष्टाचार आणि सत्तेतील घराणेशाहीविरोधात उभ्या राहिलेल्या या लाटेमुळे के.पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बालेन शाह यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं.

35 व्या वर्षी पंतप्रधान

नेपाळच्या लोकशाही इतिहासात प्रथमच एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं असून, इतक्या कमी वयात पंतप्रधान होणारे बालेन शाह हे सर्वात तरुण नेते ठरले आहेत. देशातील तरुणांनी बदलासाठी दिलेला कौल त्यांच्या विजयातून स्पष्ट दिसून येत आहेत.

कोण आहेत बालेन शाह?

बालेन शाह हे मूळचे एक प्रसिद्ध नेपाळी रॅपर आहेत. त्यांनी आपल्या गाण्यांमधून सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. त्यामुळे तरुणांमध्ये ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या गाण्यांनी आंदोलनादरम्यानही मोठी भूमिका बजावली होती.

महापौरपद ते पंतप्रधान

2022 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून काठमांडूचे महापौरपद जिंकले आणि आपल्या कामकाजातून वेगळी ओळख निर्माण केली. 2026 मध्ये त्यांनी महापौरपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रीय स्वतंत्र पक्षात प्रवेश केला आणि त्याच पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली.
या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने 275 पैकी 182 जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलं.

भारताशी असलेलं नातं

बालेन शाह यांचा भारताशीही जवळचा संबंध आहे. त्यांनी कर्नाटकातून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. ते मैथिली भाषा बोलतात आणि त्यांचा मधेसी समाजाशीही संबंध आहे, त्यामुळे भारत-नेपाळ संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वैयक्तिक जीवन

1990 मध्ये काठमांडूमध्ये जन्मलेले बालेन शाह यांचे वडील पेशाने डॉक्टर आहेत, तर आई गृहिणी आहे. ते विवाहित असून त्यांना एक मुलगी आहे. 2013 मध्ये त्यांनी नेपाळमध्ये एक मोठी रॅप स्पर्धा जिंकली होती, त्यानंतर त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली.

वाद आणि टीका

महापौर असताना त्यांनी रस्ते मोकळे करण्यासाठी आणि बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई केली होती. यामुळे अनेक लहान विक्रेत्यांवर परिणाम झाला आणि मानवाधिकार संघटनांनी त्यांच्या कारभारावर टीका केली. काही ठिकाणी तोडफोडीच्या घटनांमुळेही त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

बालेन शाह यांची पंतप्रधानपदी निवड ही नेपाळच्या राजकारणातील मोठा टर्निंग पॉईंट मानली जात आहे. तरुण नेतृत्व, नव्या अपेक्षा आणि बदलाची आशा.. या गोष्टींमुळे आता नेपाळच्या भविष्यात काय बदल होतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT