Massive power outage in Spain, Portugal and parts of France
माद्रिद: युरोप खंडातील स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्सच्या काही भागांमध्ये सोमवारी मोठ्या प्रमाणावर वीज खंडीत झाली. ज्यामुळे कोट्यवधी नागरिकांचा दैनंदिन जीवनक्रम ठप्प झाला. ही समस्या युरोपच्या पॉवर ग्रिडमध्ये आलेल्या बिघाडामुळे उद्भवल्यचा प्राथमिक अंदाज आहे.
या ऐतिहासिक ब्लॅकआउटमुळे रेल्वे, विमानतळ, इंटरनेट सेवा, मोबाईल नेटवर्क आणि ट्रॅफिक सिग्नल्ससुद्धा बंद पडले असून, संपूर्ण युरोपातील वीजव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
सोमवारी अचानक यूरोपमधील संपूर्ण आयबेरियन द्वीपकल्प (Iberian Peninsula) म्हणजेच स्पेन आणि पोर्तुगाल यांना झटका बसला. दोन्ही देशात संपूर्ण देशभरात वीजपुरवठा थांबला. फ्रान्सच्या दक्षिणेकडील भाग, अँडोरा आणि बेल्जियममध्येही विजेचा तुटवडा जाणवला.
दूरसंचार सेवा ठप्प: मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा अनेक भागांत बंद पडल्या. नागरिकांनी नेटवर्क न मिळण्याच्या तक्रारी केल्या.
हवाई सेवा विस्कळीत: माद्रिद येथील ‘बराजास आंतरराष्ट्रीय विमानतळ’ विजेअभावी बंद झाला. परिसरातील इतर विमानतळांवरही कामकाज थांबले.
रेल्वे आणि मेट्रो बंद: पोर्तुगालमधील पोर्तो आणि लिस्बन येथील मेट्रोसेवा बंद पडली. काही प्रवासी स्टेशन आणि बोगद्यात अडकले.
वाहतूक नियंत्रण कोसळलं: देशभरातील ट्रॅफिक सिग्नल्स बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
व्यवसायावर परिणाम: माद्रिदमधील अनेक दुकाने, हॉटेल्स आणि कार्यालये अंधारात गेली. इंटरनेट बंद असल्याने व्यवहार ठप्प झाले.
अद्यापही या अपघातामागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, युरोपियन पॉवर ग्रिडमध्ये काही समस्यांमुळे आयबेरियन देशांमधील राष्ट्रीय वीजप्रणालींवर परिणाम झाला.
त्याचबरोबर, फ्रान्सच्या दक्षिण-पश्चिमेकडील ‘अलारिक पर्वतरांगांमध्ये लागलेल्या आगीत परपिन्यन आणि नर्बोन शहरांदरम्यानची एक महत्त्वाची उच्च-दाब विद्युत वाहिनी नष्ट झाली, हेही एक संभाव्य कारण मानलं जात आहे.
स्पेन सरकारने तात्काळ आपत्कालीन बैठक बोलावली असून, स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. स्पेनच्या वीजपुरवठा संस्थेने (Red Electrica) सांगितलं की, उत्तर आणि दक्षिण भागांमध्ये वीज पुरवठा हळूहळू सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही टप्प्याटप्प्याने वीज सेवा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”
या घटनेमुळे युरोपातील विजेच्या एकत्रित प्रणालीवरील (European Power Grid) अवलंबन आणि तिच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. यासारख्या अपघातांमुळे संपूर्ण खंडावर परिणाम होऊ शकतो, हे या घटनेने दाखवून दिलं.