पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅथलिक चर्चचे प्रमुख आणि ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. रक्त चाचण्यांत त्यांची किडनी निकामी झाल्याचे दिसून आले आहे. तरीही ते प्रतिसाद देत असून ते प्रार्थनेत सहभागी झाले, असे व्हॅटिकनने (Vatican) म्हटले आहे. ८८ वर्षीय पोप फ्रान्सिस न्यूमोनिया आणि फुफ्फुसांशी संबंधित गुंतागुंतीच्या संसर्गाशी लढा आहेत. रविवारी त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. याबाबतचे वृत्त एपी वृत्तसंस्थेने दिले आहे.
पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीबाबत व्हॅटिकनने जारी केलेल्या निवेदनानुसार, शनिवारी रात्रीपासून पोप यांना श्वसनाचा आणखी काही त्रास जाणवलेला नाही. तरीही त्यांना उच्च ऑक्सिजनच्या सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
त्यांच्या काही रक्त चाचण्यांत प्राथमिक टप्प्यात सौम्य प्रमाणात किडनी निकामी झाल्याचे दिसून आले आहे. पण डॉक्टरांकडून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी जगभरातून प्रार्थना केली जात आहे.
पोप फ्रान्सिस यांनी २०१३ मध्ये पोपपद स्वीकारले होते. पोप हे कॅथलिक ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू असतात. ते व्हॅटिकन सिटीमधून जगभरातील भाविकांना संबोधित करतात.