पुढारी ऑनलाईन डेस्क : युरोपमधील सर्वात प्रभावी राष्ट्र अशी ओळख असणार्या जर्मनीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि. २३) मतदानास प्रारंभ झाला आहे. दरम्यान, सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीच, चान्सलर ओलाफ शुल्झ यांची सोशल डेमोक्रॅटिक पार्टी (एसपीडी) युती मतदानपूर्व सर्वेक्षणांमध्ये खूपच मागे पडली आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच जर्मनीमध्ये सर्वेक्षणात उजव्या विचारसणीचा ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (सीडीयू) ३० टक्के मतांसह आघाडीवर आहे. तर अति-उजव्या अल्टरनेटिव्ह फर ड्यूशलँड (एएफडी) २० टक्के मतांसह विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यमान सोशल डेमोक्रॅटिक पार्टी (एसपीडी) १५ टक्के मतांसह तिसऱ्या स्थानावर आहे. (German election 2025 )
कट्टर राष्ट्रवादी पक्ष 'अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी' हा पक्ष मागील निवडणुकीत सातव्या स्थानावर होता. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार हा पक्ष यावेळी सत्तेच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. देशातील ७० टक्के तरुणांनी या पक्षाला पसंती दिल्याचे मतदानपूर्व सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जगातील अनेक देशांबरोबरच जर्मनीमध्येही उजव्या विचारसरणीचे सरकार स्थापन होण्याचे संकेत मिळत आहेत. मतदानापूर्वी या निवडणुकीत मर्झच्या सीडीयू/सीएसयू गटाने सातत्याने निवडणुकीत आघाडी घेतली आहे. सर्वेक्षणानुसार, २९ टक्के लोक मॅट्झच्या पक्षाला पाठिंबा देत आहेत. तर कट्टरपंथी एलिसच्या पक्षाला २१ टक्के लोकांचा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या निवडणुकीत मंदावलेली अर्थव्यवस्था, स्थलांतर आणि युक्रेन युद्ध हे मुख्य मुद्दे होते. मतदानपूर्व सर्वेक्षणातील माहितीनुसार, चान्सलर स्कोल्झ यांच्या पक्षाला फक्त १६ टक्के लोकांचा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या ग्रीन पार्टीला १२ टक्के मते मिळू शकतात आणि फ्री डेमोक्रॅटिक पार्टीला ७ टक्के मते मिळू शकतात. हे दोन्ही पक्ष किंगमेकरची भूमिका बजावू शकतात, असेही मानले जात आहे.
जर्मनीमध्ये आज सकाळी आठ वाजता मतदानास प्रारंभ झाला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. ८.४ कोटी लोकसंख्या असणार्या देशात सुमारे ६ कोटी मतदार आहेत. मतदान संपल्यानंतर, एक्झिट पोल येतील आणि मतमोजणी देखील सुरू होईल. सोमवारी सकाळपर्यंत निकाल अधिकृतपणे जाहीर केले जातील.
जर्मनीच्या सार्वत्रिक निवडणुकीत जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क आणि रशियाचा हस्तक्षेप होता, असा दावा केला जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक बहुचर्चित ठरली आहे. मस्क यांनी कट्टरपंथी नेत्या अॅलिस वेडेल यांना पाठिंबा दर्शवला आहे. यासोबतच या निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेपही समोर आला आहे. विश्लेषकाच्या मतानुसार, 'डॉपेलगँगर' आणि 'स्टॉर्म-१५१६' सारखे गट रशियातील हजारो बॉट आर्मीच्या माध्यमातून निवडणुकांवर प्रभाव टाकत आहेत.
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच जर्मनीमध्ये सर्वेक्षणात उजव्या विचारसणीचा ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (सीडीयू) ३० टक्के मतांसह आघाडीवर आहे. तर अति-उजव्या अल्टरनेटिव्ह फर ड्यूशलँड (एएफडी) २० टक्के मतांसह विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोणत्याही एका पक्षाला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळतील असे दिसत नाही. जर्मनीमध्ये सत्तेत येण्यासाठी कोणत्याही पक्षाला ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवावी लागतात. त्यामुळे देशात अनेकावेळा आघाडी सरकार स्थापन होतात. यंदाही उजवे आणि अति उजव्या विचारसणीचे पक्ष एकत्र येवून आघाडीचेच सरकार स्थापन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.