इस्लामाबाद : पाकिस्तान नेहमीच आपली डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आणि ढासळणाऱ्या आरोग्य सेवांमुळे चर्चेत असतो. देशाच्या अनेक भागांमध्ये हृदयविकार, मधुमेह अशा गंभीर समस्या वाढताना दिसत आहेत. मात्र, पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील एक भाग असा आहे, जिथे येथील लोक अत्यंत निरोगी असून तब्बल १२० वर्षांपर्यंत आयुष्य जगतात. हुंजा खोऱ्यातील या लोकांच्या दीर्घायुष्याचे आणि आरोग्याचे मोठे रहस्य उघड झाले आहे. हे लोक इतके तंदुरुस्त आणि निरोगी कसे राहतात आणि त्यांचे आरोग्य रहस्य काय आहे? जाणून घ्या.
हुंजा खोऱ्यातील लोक त्यांच्या दीर्घायुष्यामुळे आणि उत्तम आरोग्यामुळे जगभर ओळखले जातात. अनेक गंभीर आजारांपासून हे लोक सुरक्षित आहेत. त्यांचे आरोग्य गुपित कोणती महागडी औषधे किंवा उपचार नसून, नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारे जर्दाळूच्या कडू बियाण्यांपासून काढलेले तेल आहे. हे तेल हुंझा टेकड्यांमध्ये पिढ्यानपिढ्या वापरले जात आहे. लोक सांधेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी, त्वचेला आणि केसांना पोषण देण्यासाठी आणि गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यासाठी वापरतात. या तेलाला या खोऱ्यातील लोकांच्या दीर्घायुष्याचे आणि निरोगी आयुष्याचे मुख्य कारण मानले जाते.
हे तेल जर्दाळूच्या बियांपासून बनवले जाते. यामध्ये 'अमिग्डालिन' नावाचा एक विशेष घटक असतो (याला व्हिटॅमिन बी१७ किंवा लेट्राइल असेही म्हणतात). या घटकात कॅन्सर-विरोधी गुणधर्म असल्याचा दावा केला जातो. वैज्ञानिकदृष्ट्या याचे पूर्ण समर्थन झाले नसले तरी, हे तेल वापरणारे लोक सकारात्मक अनुभव सांगतात. हे तेलच हुंजा खोऱ्यातील लोकांच्या निरोगी आणि दीर्घायुष्याचे मुख्य कारण मानले जाते.
कडव्या खुर्माण्याच्या तेलाने रोज मालिश केल्यास सांधेदुखी, सूज आणि संधिवाताच्या त्रासातून आराम मिळतो. हे तेल त्वचेत खोलवर शोषले जाऊन रक्ताभिसरण सुधारते.
हे तेल व्हिटॅमिन ई, सी आणि ओमेगा फॅटी ॲसिडने समृद्ध आहे. यामुळे त्वचा मऊ, तेजस्वी आणि निरोगी राहते. तसेच, केसांच्या मुळांना मजबूत करून, केस गळणे थांबवते आणि नैसर्गिक चमक आणते.
या तेलातील 'अमिग्डालिन' घटक कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतो, असे मानले जाते. मात्र, कोणत्याही वैद्यकीय उपचाराऐवजी हे तेल वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हे तेल मसाजसाठी थेट त्वचा आणि केसांवर लावले जाते. तसेच, या भागातील लोक ते स्मूदी, सॅलड किंवा पदार्थांमध्ये मिसळून खाण्यासाठीही वापरतात.