

डॉ. मनोज कुंभार
घशात नेहमीच सूज राहत असेल, तर हे स्ट्रेप थ्रोटचे लक्षण असू शकते. घसादुखी ही अनेकांना सामान्य वाटते; परंतु घसा दुखणे, सूज येणे, जळजळ होणे हे सोअर थ्रोटच्या विषाणूंमुळे होऊ शकते. यास ग्रुप ए स्ट्रेप्टोकॉकस असेही म्हटले जाते. स्ट्रेप थ्रोट हा घशात आणि टॉन्सिलवर अधिक परिणाम करतो.
स्ट्रेप थ्रोट हा एक संसर्गजन्य रोग आहे. तो बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास चांगल्या प्रकृतीच्या लोकांनादेखील होऊ शकतो. एखादा आजारी व्यक्ती आपल्यासमोर खोकत असेल किंवा शिंकत असेल, तर आपल्यालादेखील स्ट्रेप थ्रोटची समस्या होऊ शकते. स्ट्रेप थ्रोट आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी थ्रोट कल्चर टेस्ट केली जाते. अर्थात, काही लक्षणे पाहता डॉक्टरदेखील आपल्याला स्ट्रेप थ्रोट आहे की नाही, हे सांगतात. यात अँटिबायोटिक औषधी दिली जातात. यामुळे स्ट्रेप थ्रोटपासून आराम मिळेल.
स्वरयंत्रावर परिणाम, ताप, घशात खवखव, लिम्फ नोडस्वर सूज, घसादुखी, टॉन्सिलमध्ये सूज, दुखणे, भूक न लागणे, डोकेदुखी, उलटी आल्यासारखी वाटणे, तोंड येणे.
आपण वेळीच उपचार केले नाही, तर आपल्याला अनेक प्रकारचे साईड इफेक्ट होऊ शकतात. अनेक अवयवांवर परिणाम होऊ शकतो. किडनीवर सूज, रुमेटाईड फिवर, सांधेदुखी, सूज यासारखी लक्षणे दिसू शकतात.
डॉक्टरनी सांगितलेल्या औषधांचे सेवन करण्याबरोबरच काही घरगुती उपचारदेखील करू शकता.
गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करणे, थंड खाद्यपदार्थापासून लांब राहणे, गरम सूप, चहा यासारखे लिक्विड डायट घेणे, मऊ गोष्टींचे सेवन करणे. गिळताना त्रास होणार नाही, अशा पदार्थांचे सेवन करणे, वाफ घेणे, सूज आणि दुखणे कमी होऊ शकते, आले पाण्यात टाकून उकळावे, कोमट पाण्याने गुळण्या करत प्राशन करणे.