पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (दि. १६) सायप्रसमधील ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. सायप्रस प्रजासत्ताकाचे पहिले अध्यक्ष मकारिओस III यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार राष्ट्राच्या प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रप्रमुख आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना प्रदान केला जातो.
निकोसिया येथील राष्ट्रपती निवासस्थानी आजझालेल्या कार्यक्रमात सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार प्रदान केला. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी क्रिस्टोडोलाइड्स यांच्यासह सायप्रसच्या जनतेचे आभार मानले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "सायप्रसमधील सर्वोच्च सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III या पुरस्कारानेमाझा सन्मान करण्यात आला याबद्दल मी सायप्रस सरकारचे आणि जनतेचे मनापासून आभार मानतो. हा सन्मान फक्त माझा नाही, तर १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. हा त्यांच्या क्षमता आणि आकांक्षांचा सन्मान आहे. हा आपल्या देशाच्या सांस्कृतिक बंधुत्वाचा आणि "वसुधैव कुटुंबकम" च्या विचारसरणीचा सन्मान आहे. मी हा सन्मान भारत आणि सायप्रसमधील मैत्रीपूर्ण संबंधांना आणि आपल्या सामायिक मूल्यांना आणि परस्पर समंजसपणाला समर्पित करतो. सर्व भारतीयांच्या वतीने मी अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने हा सन्मान स्वीकारतो."
ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III हा सन्मान शांतता, सुरक्षा, सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि आपल्या लोकांच्या समृद्धीप्रती असलेल्या आपल्या अढळ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. मी या सन्मानाचे महत्त्व समजतो आणि भारत आणि सायप्रसमधील संबंधांप्रती असलेली जबाबदारी म्हणून तो स्वीकारतो. भविष्यात भारत आणि सायप्रसमधील भागीदारी नवीन उंची गाठेल. एकत्रितपणे, आपण केवळ आपल्या दोन्ही राष्ट्रांची प्रगती मजबूत करू शकत नाही तर शांततापूर्ण आणि सुरक्षित जागतिक वातावरण निर्माण करण्यातही योगदान देऊ, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.