पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनमधील आव्हान लक्ष्य सेन याने टिकवून ठेवले. लक्ष्य सेन आणि चायनीज तैतेईच्या चोयू टिएन चेन यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना कमालीचा चुरशीचा झाला. दोन्ही खेळाडूंमध्ये रंगलेला रॅलीचा खेळ चाहत्यांना खिळवून ठेवणारा ठरला. 0-1 अशा पिछाडीवरून भारताच्या लक्ष्यने मुसंडी मारली आणि ही मॅच 2-1 अशी जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली. ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासात बॅडमिंटनची उपांत्य फेरी खेळणारा लक्ष्य हा भारताचा पहिला पुरुष खेळाडू ठरला.
चोयू टिएन चेनने 12-9 अशी आघाडी मिळवली. परंतु, लक्ष्य दीर्घ रॅलीचा खेळ करून चेनला चुका करण्यास भाग पाडताना दिसला. लक्ष्यने 14-15 अशी पिछाडी कमी केली. चेनच्या स्मॅशला भारतीय खेळाडू सुरेख काऊंटर अटॅक करत राहिला; पण चेनने अद्भूत स्मॅश मारून पहिला गेम 21-19 असा जिंकला.
लक्ष्यने दुसर्या गेममध्ये लक्ष्यचे पुनरागमन चेनला अचंबित करणारे ठरले. लक्ष्यने दुसरा गेम 21-15 असा जिंकून सामना निर्णायक गेममध्ये नेला. तिसर्या गेममध्ये लक्ष्य सुसाट सुटला. त्याने 11-7 अशी आघाडी मिळवून गेममध्ये प्रतिस्पर्धीला बॅकफूटवर फेकले होते. भराभर गुण घेताना तिसरा गेम 21-12 असा जिंकून लक्ष्यने उपांत्य फेरीत प्रवेश केला. ऑलिम्पिक सेमी फायनल खेळणारा तो पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला.