Palwasha Khan x
आंतरराष्ट्रीय

Palwasha Khan: भारतात बाबरी मशिदीची पहिली वीट पाक सैनिक रचेल; लष्करप्रमुख असीम मुनीर पहिली अजान देतील...

Palwasha Khan: पाकिस्तानच्या खासदार पलवाशा खान यांची दर्पोक्ती; खलिस्तानी पन्नूचे केले कौतुक; दिल्लीत रक्तपाताची दिली धमकी

पुढारी वृत्तसेवा

Palwasha Khan on India

इस्लामाबाद : पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (PPP) महिला खासदार पलवाशा खान यांनी भारतविरोधी जहरी वक्तव्य करत अयोध्येतील बाबरी मशीद पुन्हा उभारण्याचा दावा केला आहे.

“बाबरी मशिदची पहिली वीट रावळपिंडीचा एक जवान रचेल आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर पहिली अजान देतील” असे वक्तव्य त्यांनी पाकिस्तानच्या संसदेत बोलताना केले आहे.

भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संसदेत केलेल्या या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. पलवाशा खान या पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे नेते बिलावल भुट्टो यांच्या अत्यंत जवळच्या नेत्या मानल्या जातात.

पाकिस्तानकडे 25 कोटी जवान

आपल्या भाषणात पलवाशा खान म्हणाल्या की, “पाकिस्तानचा विश्वास केवळ 7 लाख सैन्यावर नाही, तर 25 कोटी जनतेवर आहे. ही जनता संकटसमयी सैनिकांप्रमाणे लढेल. जर भारताने पाकिस्तानवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर दिल्लीचा लाल किल्ला रक्ताने माखलेला दिसेल.”

खलिस्तानी दहशतवाद्याचे खुले समर्थन

या भाषणात पलवाशा खान यांनी खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंत सिंह पन्नूचेही कौतुक केले. त्यांनी म्हटले की, “पाकिस्तान गुरुनानकांच्या भूमीतून युद्ध करत आहे. भारतातील शीख सैनिक पाकिस्तानविरुद्ध युद्ध करणार नाहीत.” पन्नूने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल खान यांनी त्याचे आभार मानले आहे.

वादग्रस्त व्यक्तिमत्व पलवाशा खान

पलवाशा खान या पाकिस्तानच्या संसदेतील खासदार असून त्यांनी 2016 मध्ये ISI चे माजी प्रमुख ले. जनरल (नि.) जहीर उल इस्लाम यांच्याशी विवाह केला होता. हा विवाह तब्बल 3 वर्षे गुप्त ठेवण्यात आला. 2019 मध्ये पत्रकार जाहिद गिशको यांनी हा विवाह उघड केला होता.

त्यानंतर जहीर इस्लाम यांनी त्या पत्रकाराला धमकावल्याचा दावा करण्यात आला होता.

यानंतर 2020 मध्ये पलवाशा खान यांनी स्वतःच्या आणि आपल्या मुलाच्या सुरक्षेसाठी न्यायालयात याचिका दाखल करत नवऱ्याविरोधात कायदेशीर लढा दिला होता.

पाकिस्तान लष्कराचे माजी अधिकारी आदिल रजा यांनी पलवाशा यांच्यावर गर्भवती झाल्याने जबरदस्तीने लग्न लावल्याचा आरोपही केला होता.

भारताकडून हल्ला होण्याचा दावा

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्ला तारार यांनी बुधवारी उशिरा पत्रकार परिषद घेत भारताकडून लवकरच लष्करी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली. “पाहलगाम घटनेच्या बहाण्याने भारत 24-36 तासांत भारत सैन्य कारवाई करू शकतो,” असा दावा त्यांनी केला.

“पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी ठरला आहे. आम्ही नेहमीच दहशतवादाचा निषेध केला आहे”, असेही ते म्हणाले.

भारत टाळतोय चौकशी – पाकचा आरोप

तारार यांनी असा आरोप केला की, “पाकिस्तानने पाहलगाम हल्ल्याची पारदर्शक, विश्वासार्ह आणि स्वतंत्र चौकशी करण्याची मोकळी ऑफर दिली आहे, पण भारत हे टाळत आहे आणि संघर्षाचे वातावरण तयार करत आहे. याचे दुष्परिणाम संपूर्ण दक्षिण आशियावर होतील.”

दरम्यान, पाकिस्तानच्या संसदेतून भडक वक्तव्य केले गेल्याने भारतविरोधी वातावरण उकळत ठेवण्याचा पाकिस्तानचा स्पष्ट प्रयत्न दिसून येत असल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT