Kashmir File Photo
आंतरराष्ट्रीय

Love story: ३ मिनिटांची भेट अन् डोळ्यात अश्रू...; प्रेयसीला भेटायला पाकिस्तानातून सीमा ओलांडून आलेल्या तरुणाला पाठवले माघारी

उत्तर काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये केवळ आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी नियंत्रण रेषा ओलांडून भारतात आलेल्या २२ वर्षीय पाकिस्तानी तरुणाला अखेर कायदेशीर प्रक्रियेनंतर मायदेशी परत पाठवण्यात आले.

मोहन कारंडे

Love story cross border

श्रीनगर: दोन्ही देशांमधील तणावपूर्ण सीमा आणि कडक सुरक्षा व्यवस्थाही त्यांच्या प्रेमाच्या आड येऊ शकली नाही. उत्तर काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये केवळ आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी नियंत्रण रेषा ओलांडून भारतात आलेल्या २२ वर्षीय पाकिस्तानी तरुणाला अखेर कायदेशीर प्रक्रियेनंतर मायदेशी परत पाठवण्यात आले. हा तरुण कोणताही घुसखोर नसून केवळ प्रेमापोटी भारतात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, भारतीय अधिकाऱ्यांनी मानवतावादी दृष्टिकोन दाखवत शनिवारी त्याला पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या स्वाधीन केले. मात्र, मायदेशी रवाना होण्यापूर्वी या 'मजनू'ला त्याच्या 'लॅला'सोबत अवघ्या ३ मिनिटांची भेट घेता आली.

सोशल मीडियावरून जडले प्रेम

झीशान मीर असे या २२ वर्षीय तरुणाचे नाव असून तो पाकव्याप्त काश्मीरमधील पनकेडी गावचा रहिवासी आहे. तर त्याची प्रेयसी इरम बानो ही नियंत्रण रेषेजवळील टिळवारी गावात राहते. मूळचे उरी येथीलच असलेले झीशानचे कुटुंब अनेक दशकांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थलांतरित झाले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये नातेसंबंध होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून झीशान आणि इरम यांच्यात मैत्री झाली आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले.

३१ मे रोजी झाली होती अटक

इरमच्या प्रेमात वेडा झालेल्या झीशानने ३१ मे रोजी उरी येथील सिलिकोट परिसरातून नियंत्रण रेषा ओलांडून भारतात प्रवेश केला होता. मात्र, भारतीय लष्कराने त्याला तात्काळ ताब्यात घेतले. सुरुवातीला सुरक्षेच्या कारणास्तव इरमचीही चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान हा पारंपारिक घुसखोरीचा प्रकार नसून एका प्रेमी जीवनाचा उतावळेपणा असल्याचे समोर आले. यादरम्यान सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता.

न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

तपासानंतर इरमवरील संशय दूर झाल्याने तिला सोडून देण्यात आले, तर झीशानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. जम्मू-काश्मीर पोलिसांनी उरी न्यायालयात अंतिम अहवाल सादर करताना स्पष्ट केले की, झीशान केवळ इरमला भेटण्यासाठीच सीमा पार करून आला होता. हा अहवाल स्वीकारत न्यायालयाने खटला बंद केला आणि झीशानची निर्दोष मुक्तता केली. तोपर्यंत उरी पोलीस ठाण्यात असलेल्या झीशानसाठी इरमच्या कुटुंबीयांनी कपडे आणि शूजही पाठवले होते.

"लष्कराकडून पाहुण्यासारखी वागणूक"

झीशानला भारतामध्ये अत्यंत आदराची आणि काळजीपूर्वक वागणूक देण्यात आली. भारतीय लष्कराच्या मानवतावादी मूल्यांचे हे दर्शन आहे, असे भारतीय लष्कराने अधिकृत पत्रकात म्हटले आहे.

अन् ३ मिनिटांच्या भेटीत अश्रू अनावर झाले...

सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर शनिवारी उरी येथील 'कमन क्रॉसिंग'वर झीशानला पाकिस्तानी सैन्याकडे सोपवण्यात आले. त्यापूर्वी झीशान आणि इरमची केवळ तीन मिनिटांची भेट घडवून आणण्यात आली. इरमची आई अफरोजा बेगम यांनी सांगितले की, "तो अगदी शांत होता आणि त्याने आम्हाला रडू नका असे सांगितले. भारतीय सैन्याने त्याला एखाद्या पाहुण्यासारखे सांभाळले. आता पाकिस्तानातही त्याला चांगली वागणूक मिळावी हीच अपेक्षा आहे. लवकरच इरमला व्हिसा मिळेल आणि या दोघांचे लग्न होईल, अशी आम्हाला आशा आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT