Pahalgam Terror Attack |
दिल्ली : भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीने गाळण उडालेला पाकिस्तान जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याची तयारी करत आहे, असे सूत्रांनी सांगितले. भारताकडून हल्ल्याची भीती असताना पाकिस्तानचा हा उद्धटपणा असल्याचे समजले जात आहे.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांसह मृत्यू झाला होता. दोन्ही देशांमधील तणावाचे रूपांतर लष्करी संघर्षात होऊ शकते, अशी भीती विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. भारताने या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केला आहे. भारताने सिंधू पाणी करार स्थगित करणे, अटारी सीमा बंद करणे आणि पाकिस्तानी विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे, असे अनेक मोठे उपाय पाकिस्तानविरूद्ध केले आहेत.
या प्रकरणाची माहिती असलेल्या व्यक्तींचा हवाला देऊन 'हिंदुस्तान टाईम्स' ने वृत्त दिले आहे की, पाकिस्तान या आठवड्यात जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याची तयारी करत आहे. "हे पाकिस्तानने केलेले चिथावणीखोर कृत्य आहे. भारताविरुद्धच्या शत्रुत्वात ही धोकादायक वाढ आहे," असे एका व्यक्तीने म्हटले. या अस्थिर परिस्थितीत क्षेपणास्त्र चाचणी म्हणजे उद्धट उकसवणूक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
भारतीय लष्काराची धसकी घेतलेल्या पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर नवव्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, भारतीय सैन्याने त्याला प्रत्युत्तर दिले. शुक्रवारी रात्री, जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने विनाकारण लहान शस्त्रांनी गोळीबार केला. भारतीय सैन्याने तातडीने प्रत्युत्तर दिले, असे भारतीय सैन्याने म्हटले आहे. दरम्यान, घाबरलेल्या पाकिस्तानने आपल्या हवाई दलाला सतर्क केले आहे. सीमेजवळ सैन्य वाढवले आहे.
आम्ही यापूर्वी दहशतवादाला पाठिंबा देत होतो, अशी कबुली पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी दिली. सिंधू नदीचे पाणी रोखल्यास रक्ताचे पाट वाहतील, अशी दर्पोक्ती काही दिवसांपूर्वी करणाऱ्या भुट्टो यांनी मात्र आम्ही सध्या असे काही करत नसल्याची मखलाशीही केली. पहिल्या अफगाण युद्धादरम्यान पाकिस्तानने मुजाहिद्दीनना केलेल्या आर्थिक व धोरणात्मक पाठिंब्याची कबुलीही त्यांनी दिली. हे काम आम्ही पाश्चात्त्य शक्तींसोबत समन्वय साधून केले, असे ते म्हणाले.
पाकिस्तानमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकव्याप्त काश्मिरात (पीओके) पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, सुमारे एक हजार मदरसे रिकामे केले आहेत. सोबतच, हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये सैन्याच्या तुकड्या ठेवल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराच्या तिन्ही दलांना लक्ष्य, वेळ आणि दिवस ठरवण्यासाठी पूर्ण मोकळीक दिली आहे. त्यामुळे भारत कधीही लष्करी कारवाई करेल, या भीतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये खळबळ उडाली आहे. पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान चौधरी अन्वर-उल-हक यांनी, परिस्थिती आणखी बिकट झाली तर या प्रदेशात आणीबाणी लागू केली जाऊ शकते, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.