Pakistan 4 Province economic crisis 2026: आर्थिकदृष्ट्या भिकेला लागलेल्या पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस विरोध प्रदर्शन होण्याचे प्रमाण वाढत आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा आणि सिंध प्रांतातील लोक पाकिस्तान सरकारविरोधात उभे रहात आहेत. बलुचिस्तान तर पहिल्यापासूनच पाकिस्तानपासून वेगळा होण्याची मागणी करतो आहे. त्यामुळे पाकिस्तानचे तुकडे होण्याची भीती कायम असते. त्यातच आता पाकिस्तानच्या एका मंत्र्याने पाकिस्तानला चार प्रांतात नाही तर १६ तुकड्यात विभागलं पाहिजे अशी मागणी केली आहे.
इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी (IPP) चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे केंद्रीय संचार मंत्री अब्दुल अलीम खान यांनी पाकिस्तानला १६ प्रांतात विभागलं पाहिजे त्यामुळे लोकांना सहज सुविधांचा लाभ घेता येईल. मंत्री खान यांनी यासाठी पाकिस्तानच्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आलं पाहिजे असं देखील वक्तव्य केलं आहे. त्यांनी जनतेच्या घरापर्यंत सेवा पुरवण्यासाठी छोट्या राज्यांची गरज असून त्याचा स्विकार केला जावा अशी मागणी केली आहे.
लाहोरपासून जवळपास ५० किलोमीटर दूर कामोके मध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अब्दुल अलीम खान बोलत होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांच्या पक्षाने दुर्गम भागातील लोकांच्या समस्या तात्काळ सोडवणे आणि त्याच्यावर कायमस्वरूपी उपाय शोधणे यासाठी छोट्या प्रांतांची निर्मिती करण्यात यावी यासाठी एक आंदोलन सुरू करणार आहेत.
ते पुढे म्हणाले, 'आपल्याला प्रांतांचे नाव बदलण्याची गरज नाही. आम्ही पंजाबमध्ये उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व असे नवे प्रांत तयार करायला हवेत. राजकीय पक्षांना संकुचित विचार बाजूला सोडून उदारता दाखवली पाहिजे. कारण हे सर्वांच्याच हिताचे आहे.'
नव्या प्रांत रचनेच्या प्रस्तावाचे mqm आणि इतर राजकीय पक्षांनी देखील समर्थन केलं आहे. त्यामुळे लोकांच्या वेळेचा आणि उर्जेची बचत होईल. त्यांच्या समस्येचे समाधान जवळच होऊ शकेल.
पाकिस्तानचे प्रमुख वर्तमानपत्र डॉनच्या मते, खान यांनी फक्त पंजाबच नाही तर सिंध, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या चारही प्रांतांची विभागणी करण्याची मागणी केली आहे.