Pakistan ICBM Development Intercontinental Ballistic Nuclear Missile US Range China Cooperation India Operation Sindoor Long-Range
इस्लामाबाद : पाकिस्तान आता अमेरिकेपर्यंत पोहोचू शकणाऱ्या अण्वस्त्र-सज्ज इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) विकसित करत असल्याचा धक्कादायक खुलासा Foreign Affairs या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाच्या अहवालात करण्यात आला आहे.
ही घडामोड ऑपरेशन सिंदूरनंतरच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात असून, पाकिस्तानचे अण्वस्त्र धोरणे अधिक आक्रमक होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
ICBM म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल. ही 5500 किलोमीटरहून अधिक पल्ल्याची क्षेपणास्त्रे असतात. जी पारंपरिक तसेच अण्वस्त्र दोन्ही प्रकारांच्या वॉरहेड्सने सज्ज असू शकतात.
याच श्रेणीत येणाऱ्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तान आता थेट अमेरिकेवरही लक्ष्य साधू शकतो, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.
अहवालानुसार, भारताची वाढती लष्करी ताकद आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींमुळे पाकिस्तानने आपले अण्वस्त्र कार्यक्रम अधिक तीव्र केले आहेत.
भारताची पारंपरिक लष्करी ताकद लक्षात घेता पाकिस्तान अण्वस्त्रांना आपला मुख्य डिटेरंट (अटकाव यंत्रणा) मानतो. मात्र, आता ICBM विकसित करून पाकिस्तानने शस्त्रास्त्र स्पर्धेत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्वीपासूनच चीनच्या साहाय्याने घडवला गेला असल्याचं जाणकारांचे म्हणणे आहे. चीनने या ICBM विकासाला थेट पाठिंबा दिला नसला तरी अप्रत्यक्षरीत्या त्याचे सहकार्य असल्याचा संशय अमेरिकेने व्यक्त केला आहे.
चीनच्या आर्थिक गुंतवणुकींसोबतच लष्करी सहकार्यामुळे पाकिस्तानची संरक्षण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
जर पाकिस्तान यशस्वीरित्या ICBM विकसित करतो, तर अमेरिका त्याला अण्वस्त्र शत्रुराष्ट्र (nuclear adversary) म्हणून मान्यता देऊ शकते, असे अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
आत्तापर्यंत रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांना अशा प्रकारे वर्गीकृत करण्यात आलं आहे. त्यामुळे ही एक अतिशय संवेदनशील आणि धोकादायक स्थिती मानली जात आहे.
पाकिस्तानमधील राजकीय अस्थिरता, दहशतवाद्यांचे अस्तित्व आणि अण्वस्त्रांचा संभाव्य गैरवापर ही वर्षानुवर्षे अमेरिका व भारतासाठी चिंतेची बाब राहिली आहे.
आता जर ICBM सारख्या प्रगत प्रणाली पाकिस्तानच्या ताब्यात येतात, तर त्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. दहशतवादी गटांचा अण्वस्त्रांवर नियंत्रण मिळवण्याचा धोका या सगळ्यातून उभा राहू शकतो.
थोडक्यात पाकिस्तानने ICBM विकसित करण्याचा घेतलेला मार्ग केवळ भारतासाठीच नव्हे, तर जागतिक सुरक्षेसाठीही मोठा धोका ठरू शकतो. चीनची अप्रत्यक्ष साथ, भारताशी चालू असलेला संघर्ष, आणि अमेरिकेच्या धोरणात्मक हितसंबंधांवर परिणाम — हे सर्व घटक एकत्र आल्याने हा विषय अत्यंत गंभीर बनतो.