

Pakistan Major Moiz Abbas Shah Killed Tehrik-e-Taliban Pakistan attack who captured Indian group captain Abhinandan Varthaman in 2019
इस्लामाबाद : भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना 2019 मध्ये पकडल्याचा दावा करणारे पाकिस्तान आर्मीचे मेजर सय्यद मोईज अब्बास शाह यांचा दहशतवाद्यांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. दक्षिण वझिरिस्तानमधील सरारोगा येथे झालेल्या चकमकीत ते ठार झाले.
ही चकमक पाकिस्तानविरोधी दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) आणि पाकिस्तानी लष्करात झाली. या हल्ल्यात एकूण 14 पाकिस्तानी जवान ठार झाले आहेत. ज्यात मेजर शाह यांचाही समावेश आहे.
फेब्रुवारी 2019 मध्ये भारताने पाकिस्तानने केलेल्या पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरांवर हवाई हल्ला केला होता. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तानमध्ये हवाई संघर्ष झाला.
ज्यात अभिनंदन वर्धमान यांचे मिग-21 बायसन विमान पाक हद्दीत कोसळले. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने त्यांना पकडले. त्या वेळी मेजर मोईज अब्बास शाह यांनी अभिनंदन यांना पकडल्याचा दावा केला होता, त्यामुळे ते प्रकाशझोतात आले.
अभिनंदन वर्धमान यांना सोडण्यासाठी भारताने आणि जगभरातून पाकिस्तानवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. अभिनंदन यांना सोडले नाही तर भारताने मोठ्या हल्ल्याची तयारी केली होती.
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय दबावामुळे अभिनंदन यांना 1 मार्च 2019 रोजी भारतात परत पाठवले होते. त्या घटनेने दोन्ही देशांतील तणाव कमालीचा वाढवला होता.
दरम्यान, या घटनेनंतर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेचा वापर करून स्वतःला नोबेल शांती पुरस्कारासाठी प्रोजेक्ट करण्याचे काम केले होते.
पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्राने दिले्लया माहितीनुसार, 24 जून 2025 रोजी पाक लष्कराने सरारोगा भागात दहशतवाद्यांविरोधात गुप्त माहितीच्या आधारे ऑपरेशन सुरू केले.
या कारवाईत 11 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर 7 जण जखमी झाले. पण या चकमकीत मेजर मोईज अब्बास शाह (वय 37, मूळ गाव: चकवाल) आणि लान्स नाईक जिब्रान उल्ला (वय 27, मूळ गाव: बन्नू) हे ठार झाले.
ISPR च्या माहितीनुसार, मेजर शाह हे या ऑपरेशनचे नेतृत्व करत होते. त्यांना त्यांच्या शौर्यासाठी आणि अनेक दहशतवादविरोधी मोहिमांतील योगदानासाठी गौरवण्यात आले होते.
पाकिस्तान सरकारने जुलै 2024 मध्ये टीटीपीला "फितना-ए-खारिज" असे घोषित केले होते आणि या संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांना "खारिजी" – समाजबाह्य असा शिक्का मारला होता.
तरीही टीटीपीचे हल्ले वाढत असून पाकिस्तानला त्याच्याच पाळलेल्या दहशतवाद्यांशी लढावे लागत आहे, अशी टीका अनेक आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी केली आहे.