इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये आज (दि.१२) दुपारी १ वाजून २६ मिनिटांनी ४.०६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे पुन्हा एकदा हादरे बसले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्यामते 'या' भूकंपाची खोली १० किलोमीटर होती. यापूर्वी ९ ते १० मेच्या मध्यरात्री पाकिस्तानला ४.० तीव्रतेचा भूकंपाचे धक्के बसले होते. त्यानंतर काही दिवसांतच हा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसात पाकिस्तानला तिसरा भूकंपाचा धक्का बसला आहे.
शनिवारी (दि.१०) पाकिस्तानला सलग दोन भूकंपांनी हादरवून टाकल्यानंतर दोनच दिवसांनी पुन्हा पाकिस्तानची जमीन हादरली. शनिवारी सकाळी ५.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि त्यानंतर काही तासांतच ४.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला, असे रॉयटर्सने वृत्त दिले आहे. आजच्या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचे किंवा जीवितहानीचे कोणतेही तात्काळ वृत्त नाही.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवड्याच्या शेवटी झालेल्या भूकंपांसारखे उथळ भूकंप सामान्यतः जमिनीच्या तीव्र हादऱ्यांमुळे अधिक धोकादायक असतात. पाकिस्तान हा जागतिक स्तरावर भूकंपप्रवण प्रदेशांपैकी एक आहे, जो भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या सक्रिय सीमेवर आहे. बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा आणि गिलगिट-बाल्टिस्तानसह अनेक प्रांत मोठ्या फॉल्ट लाइन्सजवळ आहेत, ज्यामुळे वारंवार भूकंपाचा धोका वाढतो.