Fake weddings in Pakistan
लाहोर : भारत असो की पाकिस्तान विवाह समारंभ म्हटलं की, मांडवापासून वांजत्रीपर्यंत आणि नाचगाण्यापासून जेवणाची मौज असते. आता काळानुसार विवाह समारंभात अनेक बदल झाले आहेत. बोगस लग्न हा सर्वत्र लग्नातील फसवणुकीचा प्रकार वधू किंवा वराने केवळ संपत्तीसाठी केलेला विवाह हे आजपर्यंत तुम्ही ऐकलं आणि वाचलं असेल;पण पाकिस्तानमध्ये गेली दोन वर्ष म्हणजे २०२३ पासून बोगस लग्नाचे ट्रेंड आला आहे. तरुणाईचे हे फॅड नेमकं कोणते नवे सांस्कृतिक संकेत देत आहे याविषयी जाणून घेवूया...
२०२३ मध्ये 'लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस' (LUMS) ने आयोजित केलेल्या एका बनावट विवाहानंतर या कार्यक्रमाची राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर पारंपरिक तसेच सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली आणि या प्रकारच्या कार्यक्रमांची लोकप्रियता वाढली. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये 'बोगस लग्न' (Fake Wedding) वाढतच आहे. यामध्ये 'खऱ्या' लग्नाचे वातावरण आणि समारंभ पाळले जातात, पण त्यात आयुष्यभराची बांधिलकी किंवा पाकिस्तानी विवाहांमध्ये नेहमी असणारे कुटुंबाचे दबाव नसतात.
एका रिपोर्टनुसार या बोगस लग्न समारंभात 'नवरदेव' एक महिला असते. हा समलैंगिक विवाह नसून, ही एक 'फेक वेडिंग' असते. येथे तरुणाई सामाजिक बंधनातून मुक्त होऊन एका शानदार पार्टीचा आनंद लुटतात. हा ट्रेंड तरुण आणि प्रभावशाली लोकांमध्ये (इंफ्लुएन्सर्स) लोकप्रिय झाला असला तरी, मीडिया कव्हरेजमुळे त्याला ऑनलाइन खूप टीका आणि विरोधाचा सामनाही करावा लागला. LUMS विद्यार्थी परिषदेचे माजी अध्यक्ष सैराम एच. मिरान यांनी 'डॉयचे वेले'ला सांगितले की, या कार्यक्रमाचे फुटेज व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन ट्रोलिंग सहन करावे लागत आहे. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांसाठी साप्ताहिक सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि फेक वेडिंग हे समारंभ आणि मजा करण्यासाठी अधिक पारंपरिक आणि सामाजिकरित्या स्वीकारार्ह ठिकाण प्रदान करतात असे मानले जात होते. मात्र, टीकेनंतर विद्यार्थी परिषद आणि विद्यापीठाने विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि गोपनीयता जपण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली आहे.
समाजाचा दबाव किंवा कुटुंबाच्या नजरेपासून दूर राहून लग्नाच्या उत्साहाचा आनंद घेणे हेच या फेक वेडिंग कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे हा विशेषतः महिलांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. यादरम्यान, पारंपरिक पाकिस्तानी लग्नातील मेहंदी समारंभ आयोजित केला जातो. यात प्रामुख्याने महिला एकत्र येतात, मेंदी लावतात आणि गाणे, संगीत व नृत्याचा आनंद घेतात.
पाकिस्तानमधील वार्षिक विवाह उद्योगाचा व्यवसाय किमान ९०० अब्ज पाकिस्तानी रुपये इतका आहे. या उद्योगात फेक वेडिंग्सने स्वतःसाठी एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. काही आयोजकांचा युक्तिवाद आहे की, ते मुख्य प्रवाहातील लग्नांच्या 'कॉपी-पेस्ट शैली' ऐवजी सर्जनशीलतेवर आधारित असलेले वेगळे मापदंड, कल्पना आणि सेवा प्रदान करतात. chइस्लामाबादमधील 'शाम-ए-मस्ताना' (उत्सवी संध्याकाळ) नावाच्या एका फेक वेडिंगच्या आयोजकांनी लोकसंगीत, फॅशन आणि सांस्कृतिक परंपरा एकत्र आणून लग्नांसाठी एक नवीन आदर्श स्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. इव्हेंट क्यूरेटर अकील मुहम्मद यांनी पाकिस्तानच्या या फेक वेडिंग्सची तुलना न्यूयॉर्क शहरातील वार्षिक 'मेट गाला' कार्यक्रमाशी केली आहे.