पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ.  
आंतरराष्ट्रीय

Pakistan economic crisis |‘जगभर कर्जासाठी झोळी पसरताना लाज वाटते’: 'भीकेकंगाल' पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा जाहीर 'कबूलनामा'

Pakistan economic crisis | देशाच्या आर्थिक दुरवस्थेवर व्यक्त केली हतबलता

पुढारी वृत्तसेवा

Pakistan PM on economic crisis

"पाकिस्तानला अनेक देशांसमोर कर्जासाठी पदर पसरावा लागला असून, या आर्थिक हतबलतेमुळे देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली आहे. कर्ज घेणाऱ्याची मान नेहमी झुकलेलीच असते," अशा शब्दांमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीबाबत जाहीर कबुली दिली.

कोणकोणत्या देशांकडे कर्ज मागितले हे शब्दांत सांगू शकत नाही

शुक्रवारी (दि. ३०) रात्री इस्लामाबाद येथे निर्यातदारांना संबोधित करताना शाहबाज शरीफ कमालीचे भावूक झाले. ते म्हणाले, “आम्ही कोणकोणत्या देशांकडे जाऊन कर्जासाठी विनंती केली, हे मी तुम्हाला शब्दांत सांगू शकत नाही. त्या देशांनी आम्हाला कधी निराश केले नाही, हे खरे असले तरी कर्ज घेणाऱ्याची मान नेहमी झुकलेली असते, हेच कटू सत्य आहे.”

अनेक जाचक अटी मान्य कराव्या लागतात

जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाकडे कर्जाचे आवाहन करतो, तेव्हा त्याला अनेक जाचक अटी मान्य कराव्या लागतात. या अटींचे ओझे पेलणे अनेकदा अशक्य होऊन बसते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) अब्जावधी डॉलर्सची मदत मिळावी यासाठी आपण स्वतः अनेक अधिकाऱ्यांसह विविध देशांचे दौरे केल्याचेही शरीफ यांनी यावेळी स्पष्ट केले.

महागाईचा भडका आणि जनतेचे हाल

पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून कर्जावरच अवलंबून आहे. मात्र, यावेळी IMF ने कर्ज देताना अत्यंत कडक अटी लादल्या असून, त्याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. या अटींमुळे सरकारला नाईलाजाने मोठ्या प्रमाणावर कर वाढवावा लागला आहे. परिणामी, पाकिस्तानात महागाईने उच्चांक गाठला असून, जनतेला पीठ-डाळीसारख्या मूलभूत गरजांसाठीही संघर्ष करावा लागत आहे. उद्योगांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी आणि औद्योगिक वाढीला चालना देण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि मध्यवर्ती बँकेला योग्य पावले उचलण्याचे निर्देश दिल्याचेही शरीफ यांनी यावेळी नमूद केले.

कर्जाचा डोंगर वाढला

उपलब्ध आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२५ पर्यंत पाकिस्तानवरील विदेशी कर्जाचा बोजा ५२.३६६ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका झाला आहे. डिसेंबरपर्यंत पाकिस्तानचा परकीय चलन साठा २० अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचेल, असा अंदाज मध्यवर्ती बँकेने वर्तवला आहे. पाकिस्तानला अलीकडेच IMF कडून १.२ अब्ज डॉलर्सचा हप्ता मिळाला असून, यामुळे कर्ज परतफेड आणि चलन साठा वाढवण्यास मदत झाली आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने महागाई वाढण्याच्या भीतीने मुख्य व्याजदर १०.५% वर स्थिर ठेवला आहे. चालू आर्थिक वर्षात विकासदर (GDP) ३.७५% ते ४.७५% राहण्याचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT