Pakistan file photo
आंतरराष्ट्रीय

Pakistan: "अमेरिकेने आमचा वापर टॉयलेट पेपरसारखा केला!" पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची संसदेत खळबळजनक कबुली

Pakistan US relations: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत एक खळबळजनक विधान केले आहे.

मोहन कारंडे

Pakistan

नवी दिल्ली : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत एक खळबळजनक विधान केले आहे. अमेरिकेने स्वतःच्या फायद्यासाठी पाकिस्तानचा वापर केला आणि काम झाल्यावर त्यांना 'टॉयलेट पेपर' प्रमाणे फेकून दिले, अशी कबुली त्यांनी दिली आहे. अमेरिकेच्या युद्धात सामील झाल्यामुळे पाकिस्तानला आज मोठी किंमत मोजावी लागत आहे, असेही ते म्हणाले.

जिहादच्या नावाखाली मोठी चूक

ख्वाजा आसिफ म्हणाले, अफगाणिस्तान युद्धात सामील होणे हा इस्लामच्या रक्षणासाठी घेतलेला निर्णय नव्हता. पाकिस्तानी तरुणांना 'जिहाद'च्या नावाखाली लढायला आणि मरायला पाठवणे ही एक मोठी चूक होती. १९८० च्या दशकात सोव्हिएत युनियनविरुद्ध (रशिया) लढणे हे कोणतेही धार्मिक कर्तव्य नव्हते, तर ती अमेरिकेची एक चाल होती. पाकिस्तान विनाकारण त्या युद्धात पडला आणि त्याचे परिणाम देश आजही भोगत आहे. या युद्धांचे समर्थन करण्यासाठी पाकिस्तानने आपल्या शालेय अभ्यासक्रमातही बदल केले होते, जे आजही पूर्णपणे सुधारता आलेले नाहीत. माजी लष्करी राज्यकर्त्यांनी पाकिस्तानला अशा युद्धांमध्ये ढकलले जी आपली नव्हतीच, असा आरोप आसिफ यांनी केला.

'अमेरिकेने वापर केला आणि सोडून दिले'

ख्वाजा आसिफ यांनी अतिशय कडक शब्दांत अमेरिकेवर टीका केली. ते म्हणाले की, १९९९ नंतर अमेरिकेसोबत पुन्हा उभे राहण्याची पाकिस्तानला खूप मोठी किंमत चुकवावी लागली, ज्यातून देश आजही सावरू शकलेला नाही. त्यांनी माजी लष्करी शासक झिया-उल-हक आणि परवेझ मुशर्रफ यांच्यावर थेट हल्ला चढवत आरोप केला की, त्यांनी पाकिस्तानला अशा युद्धांमध्ये ढकलले जे त्यांचे नव्हतेच. संसदेत अत्यंत कडक शब्द वापरत ख्वाजा आसिफ म्हणाले की, पाकिस्तानचा वापर 'टॉयलेट पेपरपेक्षाही वाईट' पद्धतीने केला गेला. आधी गरज पडली तेव्हा सोबत घेतले आणि नंतर सोडून दिले.

११ सप्टेंबर २००१ नंतरच्या काळाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील 'वॉर ऑन टेरर'मध्ये तालिबानविरुद्ध भूमिका घेतली. नंतर अमेरिका तिथून निघून गेली, पण त्या युद्धाचे दीर्घकालीन दुष्परिणाम पाकिस्तान आजही सोसत आहे. या नुकसानीची भरपाई कधीच होऊ शकत नाही, असे ख्वाजा आसिफ म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT