पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सियालकोट कॅन्टोन्मेंट भागात मोठ्या थाटामाटात एका 'पिझ्झा हट' आउटलेटचे उद्घाटन केले. 
आंतरराष्ट्रीय

Pakistan Fake Pizza Hut|पाकच्या संरक्षण मंत्र्यांची पुन्हा नाचक्की; 'पिझ्झा हट'च्या बोगस दुकानाचे उद्घाटन, कंपनीने टाकली पोस्ट

ट्रेडमार्कचा गैरवापर केल्याप्रकरणी कंपनीने संबंधितांकडे रीतसर तक्रार दाखल

पुढारी वृत्तसेवा

Pakistan Fake Pizza Hut

सियालकोट: पाकिस्तानची जगभरात नाचक्की करणारी घटना समोर आली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सियालकोट कॅन्टोन्मेंट भागात मोठ्या थाटामाटात एका 'पिझ्झा हट' (Pizza Hut) आउटलेटचे उद्घाटन केले. मात्र, अवघ्या काही वेळातच मूळ अमेरिकन कंपनीने हे आउटलेट बनावट असल्याचे जाहीर केल्याने संरक्षण मंत्र्यांना तोंड लपविण्याची नामुष्की ओढवली आहे.

मोठ्या थाटामाटात केले पिझ्झा हटचे उद्घाटन

सियालकोटमध्ये नुकताच एका पिझ्झा हटचा उद्घाटन सोहळा पार पडला. रेड कार्पेट, फुलांची सजावट आणि कॅमेऱ्यांच्या लखलखाटात संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी मोठ्या तोऱ्यात रिबन कापून या रेस्टॉरंटचे उद्घाटन केले. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, पिझ्झा हटच्या अधिकृत स्टोअर लिस्टमध्ये सियालकोटमधील या शाखेचा उल्लेख नसल्याचे काही नेटकऱ्यांच्या लक्षात आले.

पिझ्झा हटने तत्‍काळ केली पोस्‍ट, तात्काळ कारवाईची मागणी

पाकिस्‍तानमधील बोगसगिरी प्रकरणी 'पिझ्झा हट पाकिस्तान'ने तात्‍काळ सोशल मीडियावर पोस्‍ट केली. कंपनीने म्हटले आहे की, "सियालकोट कॅन्टोन्मेंटमध्ये उघडण्यात आलेले आउटलेट अनधिकृत आहे. ते आमच्या ब्रँडच्या नावाचा चुकीचा वापर करत आहे. या आउटलेटचा पिझ्झा हट पाकिस्तान किंवाआमच्‍या 'ब्रँड्स'शी कोणताही संबंध नाही. हे आउटलेट पिझ्झा हटच्या आंतरराष्ट्रीय रेसिपी, गुणवत्ता मानकं आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन करत नाही. आपल्या ट्रेडमार्कचा गैरवापर केल्याप्रकरणी कंपनीने संबंधित अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार दाखल केली असून त्वरित कारवाईची मागणी केली आहे."

या देशात आता काही तरी अस्सल उरले आहे का? : सोशल मीडियावर टीकेची झोड

एका वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्याने कोणत्याही पडताळणीशिवाय बनावट आउटलेटचे उद्घाटन केल्यामुळे सोशल मीडियावर पाकिस्तान सरकारची मोठी खिल्ली उडवली जात आहे. "एकीकडे रिबन कापली गेली आणि दुसरीकडे कंपनीने पत्रक काढले, हा एक विक्रमच म्हणावा लागेल," असा टोला एका युजरने लगावला आहे. तर "एका देशाच्या संरक्षण मंत्र्याला साध्या बनावट आउटलेटची ओळख पटू नये? ही केवळ प्रशासकीय चूक नसून अक्षम्य हलगर्जीपणा आहे," असे एकाने म्हटले आहे. उर्दूमध्ये प्रतिक्रिया देताना एकाने लिहिले, "या देशात आता काही तरी अस्सल उरले आहे का? की सर्व काही बनावटच आहे?"

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT