पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डाेनाल्‍ड ट्रम्‍प. File Photo
आंतरराष्ट्रीय

US strikes on Iran : आधी ट्रम्‍प यांच्‍या 'नोबेल'साठी लाचारी, आता इराणवरील हल्‍ल्‍याचा पाकिस्‍तानकडून 'निषेध'

म्‍हणे, अमेरिकेचा इराणवरील हल्‍ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे व संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचे उल्लंघन

पुढारी वृत्तसेवा

US strikes on Iran : भारत-पाकिस्तान तणावाच्या वेळी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी निर्णायक राजनैतिक हस्तक्षेप केला. याबद्दल त्‍यांना ०२६ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी पाठिंबा दर्शवत अमेरिकेसमाेर लाचारी पत्करणार्‍या पाकिस्‍तानने अवघ्या २४ तासांत घुमजाव केला आहे. पाकिस्तानने रविवारी इराणच्या अणुभट्ट्यांवरीलअमेरिकेच्या लष्करी हल्ल्यांचा निषेध केला आहे.

इराणला स्वतःचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत ‘X’ खात्यावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेचे हे हल्ले "आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सर्व नियमांचे उल्लंघन करतात." तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार इराणला स्वतःचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे."

हिंसाचारात झालेली अभूतपूर्व वाढ अत्यंत चिंताजनक

आम्हाला या प्रदेशात तणाव आणखी वाढण्याच्या शक्यतेबद्दल गंभीर चिंता वाटत आहे. इराणविरुद्ध सुरू असलेल्या आक्रमणामुळे तणाव आणि हिंसाचारात झालेली अभूतपूर्व वाढ अत्यंत चिंताजनक आहे. तणावात आणखी वाढ झाल्यास त्याचे या प्रदेशावर आणि त्यापलीकडे गंभीर परिणाम होतील, असेही पाकिस्‍तानच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाने म्‍हटलं आहे.

मुत्सद्देगिरी हाच शांततेचा एकमेव शाश्वत मार्ग

इराणसोबत ९०० किलोमीटरची सीमा लागून असलेल्या पाकिस्तानने इस्रायल आणि इराणमधील संघर्ष तात्काळ थांबवण्याचे आवाहन केले आहे. लष्करी मार्गाऐवजी मुत्सद्देगिरी हाच शांततेचा एकमेव शाश्वत मार्ग असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. "संयुक्त राष्ट्रांच्या सनदेची तत्त्वे आणि उद्दिष्टांनुसार संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबणे, हाच या प्रदेशातील संकटे सोडवण्याचा एकमेव व्यवहार्य मार्ग आहे," असेही पाकिस्तानने म्‍हटले आहे.

ट्रम्‍प यांना नोबेल मिळावा म्‍हणून पाकिस्‍तानची 'लाचारी'

पाकिस्तान सरकारने शनिवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पुढील वर्षीच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी औपचारिकपणे नामांकित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले होते. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत दुपारच्या जेवणासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी ही घोषणा करण्यात आली. पाकिस्तान सरकारने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांना २०२६ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी औपचारिकपणे शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडील भारत-पाकिस्तान संकटादरम्यान त्यांनी केलेल्या निर्णायक राजनैतिक हस्तक्षेपाबद्दल आणि महत्त्वपूर्ण नेतृत्वाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात यावा," असे पाकिस्तान सरकारने म्हटले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT