Masood Azhar bounty Pakistan : ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या 'फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स' (FATF) च्या बैठकीपूर्वी पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्यासाठी नवा डाव आखला आहे. पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (FIA) २०२६ ची 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवाद्यांची नवी रेड बुक यादी जाहीर केली असून, यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्यावर ७० लाख पाकिस्तानी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यापूर्वी हे बक्षीस ५० लाख रुपये होते, त्यात आता २० लाखांची वाढ करण्यात आली आहे.पाकवर पुन्हा एकदा 'ग्रे लिस्ट'मध्ये जाण्याची टांगती तलवार असल्यानेच हा दिखावा केला जात असल्याचे मानले जात आहे.
पाक सरकार २०२१ पासून मसूद अजहर अफगाणिस्तानात पळून गेल्याचा दावा करत आहे. मात्र, भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या गेल्या सहा महिन्यांच्या तांत्रिक विश्लेषणातून अजहर अफगाणिस्तानात नसून पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील नवाबशाह शहरातच लपून बसल्याचे उघड झाले आहे. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यासह भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा अजहर मास्टरमाईंड आहे.
एफआयएच्या नव्या यादीत २६/११ च्या मुंबई हल्ल्याशी संबंधित १९ दहशतवाद्यांची नावे आहेत. यात १५ वर्षांपासून फरार असलेल्या १७ दहशतवाद्यांचा समावेश आहे. मात्र, कारवाईचा आव आणताना पाकने आपल्या लाडक्या दहशतवाद्यांना वाचवण्याचे कामही केले आहे.अल-हुसैनी नौका पुरवणाऱ्या मुहम्मद खान आणि अब्दुल रहमान या दोन मुख्य आरोपींच्या छायाचित्रांसह त्यांचा लष्कर-ए-तय्यबाशी असलेला संबंध यादीतून हटवण्यात आला आहे.हल्लेखोरांना सागरी मार्गाने मदत करणाऱ्या ११ लष्कर दहशतवाद्यांची नावे यादीत कायम आहेत.हल्ल्यासाठी आर्थिक मदत पुरवणाऱ्या ६ दहशतवाद्यांचाही यात समावेश आहे.
पाकिस्तानच्या यादीनुसार गेल्या ५ वर्षांत मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढली आहे. २०२१ मधील रेड बुकमध्ये १,३३० नावे होती, जी आता वाढून १,८०४ वर पोहोचली आहेत. भारतीय यंत्रणांनुसार, हे सर्व दहशतवादी सध्या पाकिस्तानातच मोकाट फिरत असून आंतरराष्ट्रीय दबाव कमी करण्यासाठीच पाकिस्तानने ही कागदोपत्री कारवाई केली आहे.