पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज (दि. २९) हा दावा फेटाळून लावत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
खैबर पख्तुनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात १३ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानमधील दैनिक ‘द डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या (ISPR) हवाल्याने, १३ सैनिकांचा बळी घेणारा तसेच १० लष्करी कर्मचारी आणि १९ नागरिक जखमी झालेला हा हल्ला ‘फितना-अल-खवारीज’ या गटाने केला होता. दक्षिण वझिरीस्तानमध्ये गुप्तचर-आधारित कारवाईत (IBO) दोन सैनिक ठार आणि ११ दहशतवादी मारले गेल्यानंतर काही दिवसांतच हा हल्ला झाला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ‘एक्स’ पोस्ट करत "२८ जून रोजी वझिरीस्तानवर झालेल्या हल्ल्यासाठी भारताला दोष देणारे पाकिस्तानी लष्कराचे अधिकृत निवेदन आम्ही पाहिले आहे. आम्ही हे विधान अत्यंत तिरस्काराने फेटाळून लावत आहोत." असे म्हटले आहे.
'एएफपी'च्या रिपोर्टनुसार, २०२१ मध्ये काबूलमध्ये तालिबान सत्तेवर परतल्यापासून अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या प्रदेशांमध्ये हिंसाचारात मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानविरुद्ध हल्ल्यांसाठी अफगाणिस्तान आपली जमीन वापरू देत असल्याचा आरोप इस्लामाबादने केला आहे. तालिबानने हा दावा फेटाळला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान या दोन्ही प्रांतांमध्ये सरकारविरोधात लढणाऱ्या सशस्त्र गटांच्या हल्ल्यांमध्ये सुमारे २९० लोक मारले गेले आहेत, ज्यात बहुतेक सुरक्षा अधिकारी आहेत.