Pakistan Asim Munir nuclear warning  file photo
आंतरराष्ट्रीय

आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही; पाकिस्तानची अमेरिकेतून भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी

Pakistan nuclear warning : पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीवरून भारताला थेट अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे.

मोहन कारंडे

Pakistan nuclear warning :

वॉशिंग्टन: पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीवरून भारताला थेट अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे. "जर भारताकडून आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला, तर आम्ही अर्धे जग नष्ट करू," असा गंभीर इशारा मुनीर यांनी दिला.

एका खासगी कार्यक्रमात बोलताना मुनीर यांनी ही गरळओक केली. फ्लोरिडातील टँपा येथे उद्योगपती आणि मानद वाणिज्य दूत अदनान असद यांनी आयोजित केलेल्या एका डिनर पार्टीत मुनीर म्हणाले, "आम्ही एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहोत. जर आम्हाला वाटले की आमचे अस्तित्व धोक्यात आहे, तर आम्ही अर्ध्या जगाला आमच्यासोबत खाली खेचू." अमेरिकेच्या भूमीवरून तिसऱ्या देशाविरोधात अशा प्रकारची अणुबॉम्बची धमकी देण्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे.

भारतासोबतच्या संघर्षानंतर गेल्या दोन महिन्यांतील दुसऱ्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या मुनीर यांनी सिंधू नदीच्या नियंत्रणावरूनही भारताला लक्ष्य केले. मुनीर म्हणाले, "भारत धरण बांधेपर्यंत आम्ही वाट पाहू आणि ते बांधल्यावर आम्ही १० क्षेपणास्त्रांनी ते नष्ट करू. सिंधू नदी ही भारतीयांची खासगी मालमत्ता नाही. आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही."

भारताची मर्सिडीजशी, तर पाकिस्तानची डंप ट्रकशी तुलना

अमेरिकेच्या भूमीवरून भारताला धमक्या देताना आणि पाकिस्तानच्या तेल व खनिज संपत्तीबद्दल बढाई मारताना, लष्करप्रमुख मुनीर यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सत्य परिस्थिती मात्र स्वतःच उघड केली. फ्लोरिडात पाकिस्तानी समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना मुनीर म्हणाले, "भारत म्हणजे महामार्गावरून वेगाने येणारी चकचकीत मर्सिडीज आहे, पण आम्ही खडीने भरलेला एक डंप ट्रक आहोत. जर ट्रकची गाडीला धडक बसली, तर नुकसान कोणाचे होईल?" मुनीर यांनी असाही दावा केला की, "भारत स्वतःला जागतिक नेता म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करतो, पण वास्तवात तो त्यापासून खूप दूर आहे." कॅनडात शीख नेत्याची हत्या, कतारमध्ये आठ भारतीय नौदल अधिकाऱ्यांची अटक आणि कुलभूषण जाधव प्रकरण या घटनांचा संदर्भ देत, आंतरराष्ट्रीय दहशतवादात भारताच्या कथित सहभागाचे हे 'अकाट्य पुरावे' असल्याचा दावाही त्यांनी केला.

राजकीय आणि लष्करी नेत्यांच्या भेटीगाठी

आपल्या दौऱ्यात मुनीर यांनी अमेरिकेतील वरिष्ठ राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली. टँपा येथे मुनीर यांनी यूएस सेंट्रल कमांडचे निवृत्त होणारे कमांडर जनरल मायकल कुरिल्ला यांच्या निवृत्ती समारंभाला आणि सेंटकॉमचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणारे ॲडमिरल ब्रॅड कूपर यांच्या पदग्रहण सोहळ्याला हजेरी लावली. त्यांनी जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे चेअरमन जनरल डॅन केन यांच्याशीही चर्चा केली आणि त्यांना पाकिस्तानला भेट देण्याचे निमंत्रण दिले. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मुनीर यांनी मित्र देशांच्या संरक्षण प्रमुखांशीही चर्चा केली. या दौऱ्यापूर्वी जून महिन्यात मुनीर यांनी अमेरिकेचा पाच दिवसांचा दौरा केला होता, ज्यात त्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत एका खासगी भोजनात भाग घेतला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT