इस्रायलने भारताच्या आत्मसंरक्षणाच्या हक्काचे जाहीररित्या केले होते. तेव्हापासून पाकिस्तान सातत्याने इस्रायल -भारत मैत्रीवर भाष्य करत आहे.
Asim Munir Hindu Jewish Ties Threat : "हिंदू आणि ज्यू यांच्यातील मैत्री वाढत आहे. ही मैत्री पाकिस्तान आणि संपूर्ण मुस्लिम जगासाठी धोका आहे," असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी म्हटले आहे, असा दावा इराणचे उच्च सुरक्षा अधिकारी मोहसेन रेझाई यांनी केला आहे. २६ ऑक्टोबर रोजी तेहरान येथे झालेल्या चार देशांच्या सुरक्षा बैठकीदरम्यान त्यांनी मुनीर यांनी विधान केल आहे. रेझाई यांचा एक व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये मुनीर आणि तुर्कीच्या गुप्तचर प्रमुख इब्राहिम कालिन यांच्या संदर्भात बोलताना दिसतात.
लाहोरमधील '२४ न्यूज एचडी' वृत्तवाहिनीने, इराणचे सुरक्षा प्रमुख मोहसेन रेझाई यांनी इराणच्या सरकारी प्रसारक 'आयआरआयबी' (IRIB) ला दिलेल्या मुलाखतीचा हवाला देत वृत्त दिले आहे की, मुनीर यांनी मुस्लिमांविरुद्ध आणि पाकिस्तानच्या विरोधात हिंदू व ज्यू यांच्यात वाढत असलेल्या संबंधांबाबत चिंता व्यक्त केली आहे.
मध्यपूर्वेतील इस्रायल आणि अमेरिकेसोबत वाढलेला तणाव कमी करण्याच्या उद्देशाने २६ ऑक्टोबर रोजी तेहरान येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पाकिस्तानकडून लष्करप्रमुख असीम मुनीर, तुर्कीकडून गुप्तचर प्रमुख इब्राहिम कालिन, सौदी अरेबियाकडून संरक्षण मंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान आणि इराणकडून सुरक्षा प्रमुख मोहसेन रझाई उपस्थित होते. रझाई यांच्या दाव्यानुसार, तुर्कीच्या गुप्तचर प्रमुखांनीही इस्रायलकडून असलेल्या धोक्यावर आक्रमक भूमिका मांडली. तर मुनीर यांनी "हिंदू आणि ज्यू एकत्र येत असून ही युती मुस्लिम जगतासाठी आणि विशेषतः पाकिस्तानसाठी भू-राजकीय धोका निर्माण करत आहे," असा मुद्दा लावून धरला.
पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार नजम सेठी यांनीही आपल्या यूट्यूब चॅनेलवर या घडामोडींवर भाष्य केले आहे. रझाई यांच्या मुलाखतीचा संदर्भ देत सेठी म्हणाले, "असीम मुनीर यांनी बैठकीत हिंदू-ज्यू समीकरणावर स्पष्ट इशारा दिला होता. 'हिंदू आणि ज्यू यांची युती आपल्यासाठी अत्यंत घातक ठरणार आहे' असे वक्तव्य मुनीर यांनी इतर नेत्यांसमोर केले होते."
असीम मुनीर यांनी यापूर्वीही अनेकदा हिंदू आणि मुस्लिम यांच्यात धार्मिक भेद स्पष्ट करणारी वक्तव्ये केली आहेत. दोन्ही समुदाय मूळतः वेगळे असल्याचे सांगत त्यांनी 'द्वि-राष्ट्र सिद्धांताचा' पुनरुच्चार केला होता. एप्रिल २०२५ मध्ये पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवस आधीही त्यांनी हिंदू-मुस्लिम संस्कृती, परंपरा आणि विचारसरणीतील भिन्नतेवर प्रक्षोभक भाषण केले होते. त्यामुळे रझाई यांनी केलेला दावा - जरी अधिकृतपणे पडताळता आला नसला तरी - मुनीर यांच्या नेहमीच्या भारतविरोधी आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या वक्तव्यांशी सुसंगत मानला जात आहे.
भारत आणि इस्रायलमधील धोरणात्मक आणि संरक्षण संबंध दिवसेंदिवस मजबूत होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेब्रुवारी २०२६ मधील इस्रायल दौऱ्यादरम्यान उभय देशांतील संबंधांना 'विशेष धोरणात्मक भागीदारी'चा दर्जा देण्यात आला होता. मे २०२५ मधील 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान इस्रायलने भारताच्या आत्मसंरक्षणाच्या हक्काचे जाहीर समर्थन केले होते.त्याचप्रमाणे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या वर्षाच्या सुरुवातीला भारत, इस्रायल, ग्रीस आणि सायप्रस या देशांचा समावेश असलेल्या नव्या प्रादेशिक समीकरणाचा प्रस्ताव मांडला होता.