Pakistan Airstrike Kabul
काबूल: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून, मंगळवारी पाकिस्तानने काबूलमधील एका रुग्णालयावर भीषण हवाई हल्ला केल्याचा आरोप तालिबान सरकारने केला आहे. या हल्ल्यात व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांसह तब्बल ४०० जणांचा मृत्यू झाला असून २५० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक वेळेनुसार रात्री ९ च्या सुमारास काबूल शहर भीषण स्फोटांनी हादरून गेले. शहराच्या मध्यवर्ती भागातील 'शहर-ए-नौ' आणि 'वझीर अकबर खान' परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते शराफत झमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ व्यसनमुक्ती केंद्राच्या रुग्णालयावर हा हल्ला झाला असून इमारतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी 'X' वर या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. "पाकिस्तानी लष्कराने पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आहे. हा हल्ला म्हणजे अमानवीय गुन्हा आहे," अशा शब्दांत त्यांनी ताशेरे ओढले. मृतांमध्ये उपचार घेत असलेल्या सामान्य नागरिकांचा आणि रुग्णांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, हा हल्ला केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यासाठी केला होता. काबूल आणि नांगरहारमधील तांत्रिक उपकरणे आणि दारूगोळा साठवण्याच्या ठिकाणांवर अचूक मारा करण्यात आला. नागरी हानी टाळण्यासाठी काळजी घेतल्याचा दावा पाकिस्तानने केला असून तालिबानचे आरोप दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. अफगाणिस्तानकडून सीमेवर ड्रोन हल्ले होत असल्याचा आरोप करत पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी तालिबानला इशारा दिला होता. त्यानंतर पाकिस्तानने ही मोठी कारवाई केली आहे. अफगाणिस्तानचे उप-पंतप्रधान अब्दुल सलाम हनफी यांनी या घटनेचा निषेध करताना म्हटले की, "देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अफगाणिस्तानवर हे युद्ध लादले जात आहे."