Pakistan strikes Afghanistan border
इस्लामाबाद: कराचीमधील सिंध रेंजर्सच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला २४ तास उलटण्यापूर्वीच पाकिस्तानने रविवारी अफगाणिस्तान सीमेजवळील दहशतवाद्यांच्या तळांवर मोठा लष्करी हल्ला चढवला. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे जमिनीवरून आणि हवेतून केलेल्या या कारवाईत २९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. 'एपी' या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पाकिस्तानने थेट अफगाणिस्तानच्या सीमेच्या आत घुसून पक्तिया, पक्तिका आणि कुनार या प्रांतांमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी 'एक्स'वर या कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले की, प्रतिबंधित 'तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' म्हणजेच 'फितना अल-ख्वारिज' आणि 'जमात-उल-अहरार' या दहशतवादी संघटनांचे तळ या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
पाकिस्तानी सुरक्षा दलांनी सर्वप्रथम खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात जमिनीवरून शोध मोहीम राबवली. या कारवाईत 'खान फरोश' नावाच्या कमांडरसह चार दहशतवादी मारले गेले. यानंतर लगेचच अफगाणिस्तानच्या हद्दीतील तीन मोठ्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये २५ दहशतवादी मारले गेले असून, त्यांचा मोठा शस्त्रसाठा आणि दारूगोळा नष्ट करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री कराचीतील सिंध रेंजर्सच्या प्रादेशिक मुख्यालयावर दहशतवाद्यांनी बंदूक आणि स्फोटकांच्या साहाय्याने भीषण हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी आधी मुख्य गेटवर वाहन आदळवले आणि नंतर अंदाधुंद गोळीबार करत ग्रेनेड फेकले. यात सुरक्षारक्षक शहीद झाले होते. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल ३ दहशतवाद्यांना ठार केले, तर एका जखमी अफगाण नागरिकाला अटक केली आहे. 'जमात-उल-अहरार' या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती, ज्याचा बदला पाकिस्तानने रविवारी घेतला.
"पाकिस्तानने नेहमीच या भागात शांतता आणि स्थैर्य राखण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आमच्या नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, तीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे." -अताउल्लाह तरार, माहिती मंत्री, पाकिस्तान
गेल्या काही वर्षांत पाकिस्तानात सुरक्षा दलांवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार 'टीटीपी'च्या दहशतवाद्यांना आश्रय देत असून, तिथूनच पाकिस्तानात हल्ले घडवून आणले जात असल्याचा आरोप इस्लामाबादने वारंवार केला आहे. काबूलने (तालिबान सरकार) नेहमीच हे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने थेट अफगाण हद्दीत केलेल्या या ताज्या कारवाईवर तालिबान सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.