Pakistan air strike In Afghanistan:
अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात पाकिस्ताननं लष्करी कारवाई करत पुन्हा एकदा तणाव वाढवला आहे. रात्री उशिरा पाकिस्तानी सेनेने हवाई हल्ला केला. त्यात ९ मुलांचा आणि एका महिलेचा मृत्यू झाल्याचं अफगाणिस्तान तालिबानकडून सांगण्यात आलं.
अफगाणिस्तान तालिबानाचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये ५ मुलांचा आणि चार मुलींचा समावेश आहे. मुजाहिद यांनी सांगितलं की हा हल्ला गरेबजवो जिल्ह्यातील स्थानिक निवासी विलायत खान यांच्या घरावर करण्यात आला. त्यात त्यांचे संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं आहे. हा हल्ला रात्री १२ वाजता करण्यात आला.
तालिबानी नेता जबीहुल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानी सेनेनं खोस्त भागाव्यतिरिक्त कुनर आणि पक्तिका या प्रांतात देखील हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार नागरिक जखमी झाले आहे. याबाबतचे फोटो देखील मुजाहिद यांनी सोशल मीडियावर शेअर केले. यात घराच्या ढिगारे आणि मृत मुलांचे पार्थीव दाखवण्यात आले.
दुसरीकडं या हल्ल्याबाबत पाकिस्तानी सैन्य किंवा परराष्ट्र मंत्र्यांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. अफगाणिस्तानातील पाकिस्तानच्या या हल्ल्यापूर्वी एक दिवस आधी पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आत्मघातकी हल्ल्यात तीन अर्धसैनिक दलाचे जवान ठार झाले होते. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला अफगाणिस्तानात लपलेल्या कथित दहशतवाद्यांना जबाबदार धरलं होतं.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमधील तणाव गेल्या महिन्याभरापासून वाढला आहे. ऑक्टोबर महिन्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सैनिकांमध्ये चकमक उडाली होती. यात दोन्हीकडील अनेक सैनिकांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये अफगानिस्तानमध्ये तालिबान परतल्यानंतरचा हा सर्वात मोठा संघर्ष मानला जात आहे.
दरम्यान, या दोघांमध्ये सीज फायर करार देखील झाला होता. यात तुर्कस्ताननं मोठी भूमिका बजावली होती. मात्र ही सीज फायर फार काळ टिकली नाही. अफगाणिस्ताननं यातून माघार घेतली. पाकिस्ताननं अफगाणिस्तानमधील संघटनांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ही बोलणी फिसकटली.
दरम्यान, खोस्त भागात झालेल्या ताज्या बॉम्बस्फोटांमुळे तिथं राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनानं सांगितलं की रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची प्रकृती आता स्थीर आहे. मात्र या ताज्या हल्ल्यानंतर पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर तणाव वाढण्याची शक्यता आहे.