JD Vance Comments on Pahalgam Terrorist Attack
वॉशिंग्टन : अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी, २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना भारताला पाठिंबा दर्शवला. या घटनेमुळे व्यापक प्रादेशिक संघर्ष निर्माण होणार नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. २१ ते २४ एप्रिल दरम्यान जेडी व्हान्स त्यांच्या कुटुंबासह भारताच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर आले होते. याचदरम्यान पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता.
जेडी व्हान्स यांनी, पाकिस्तानला भारताला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा होऊ शकेल. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत जेडी व्हान्स म्हणाले की, 'आम्हाला आशा आहे की भारत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला अशा प्रकारे प्रत्युत्तर देईल की त्यामुळे व्यापक स्वरुपाचा संघर्ष निर्माण होणार नाही.
तुम्हाला भारत आणि पाकिस्तानबद्दल काळजी वाटते का असे विचारले असता, व्हान्स म्हणाले, "नक्कीच, कारण दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये कोणत्याही क्षणी तणाव वाढू शकतो. याची मला काळजी वाटते. आम्ही भारत आणि पाकिस्तानमधील आमच्या मित्रांशी जवळून संपर्कात आहोत."
"आम्हाला आशा आहे की भारत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला अशा प्रकारे प्रत्युत्तर देईल की ज्यामुळे व्यापक प्रादेशिक संघर्ष निर्माण होणार नाही. तसेच स्पष्टपणे सांगायचे झाले तर, पाकिस्तान ज्या प्रमाणात जबाबदार आहे त्या प्रमाणात तो, त्यांच्या हद्दीत कधीकधी सक्रिय होत असलेल्या दहशतवाद्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भारताला सहकार्य करेल," असे पुढे त्यांनी नमूद केले.
२२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी तब्बल २६ लोकांची हत्या केली. ज्यात बहुतांश हिंदू होते. हा दहशतवादी हल्ला अलिकडच्या काळात काश्मीरमधील नागरिकांवर झालेल्या सर्वात प्राणघातक हल्ल्यांपैकी एक आहे.
जेडी व्हान्स यांच्या भारत भेटीच्या दुसऱ्या दिवशी हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर, जेडी व्हान्स यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला होता.