Nepal flood File Photo
आंतरराष्ट्रीय

Nepal Flood : नेपाळमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी जागा नाही, सरकारकडून केले जात आहे दफन

नेपाळमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी जागा नाही; एअरटाइट बॅगमध्ये ठेवून अंत्यसंस्कार, भोटेकोशी नदीपासून दूर जाण्याचा सरकारचा सल्ला.

पुढारी वृत्तसेवा

No space left for bodies in Nepal; government is carrying out burials

पुढारी ऑनलाईन : शनिवार संध्याकाळपर्यंत नेपाळमध्ये ७३४ मृतदेह सापडले होते. रुग्णालयांमध्ये साठवणुकीच्या अपुऱ्या सुविधांमुळे, सरकारने मृतदेह हवाबंद पिशव्यांमध्ये ठेवून जमिनीखाली दफन करण्यास सुरुवात केली आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी स्पष्ट केले आहे की, या मृतदेहांमधील डीएनए जतन केला जाईल.

नेपाळमध्ये अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही मदत आणि बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ७०० जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर हजारो लोक अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान सरकारने भोटेकोशी नदीपासून दूर जाण्याचा नागरिकांना सल्ला दिला आहे.

नेपाळमध्ये पुरामुळे निर्माण झालेल्या या आपत्तीत आतापर्यंत सुमारे ७०० जणांचा मृत्यू झाला आहे. विविध भागांमध्ये मदत आणि बचाव पथके अद्यापही अभियान राबवत आहेत. हजारो लोक बेपत्ता आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा भीषण पुराचा इशारा देण्यात आला आहे. तिबेटच्या पर्वतीय भागात बर्फाचा मोठा तुकडा तुटल्यामुळे यापूर्वी मोठी आपत्ती ओढवली होती. त्यानंतर पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात मलबा आणि महाकाय दगड वाहून आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता पुन्हा तिबेटमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आणि मलबा पुन्हा खालच्या भागात येण्याची शक्यता आहे. या प्रवाहाच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही वस्तूचे मोठे नुकसान होऊ शकते.

नेपाळच्या नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटीने लोकांना सतर्क करत एक्सवर म्हटले आहे, “रासुवा जिल्हा प्रशासन कार्यालयाला भोटेकोशी नदीच्या पुराचा प्रवाह वेगाने वाढल्याचा आवाज ऐकू आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे नदीच्या आसपासच्या रासुवा, नुवाकोट आणि धाडिंग या भागांतील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. आणखी माहिती मिळताच आम्ही पुढील अपडेट देऊ.”

२७५ हून अधिक भारतीय बेपत्ता

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या भीषण पुरानंतर २७५ हून अधिक भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. दरम्यान, १०८ जणांची सुटका करण्यात आली आहे. भारतीय वंशाचे १२८ लोकही बेपत्ता आहेत. गेल्या दोन दिवसांत ५९८ भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये दाखल झाले आहेत. तर सुमारे ९०० भारतीय नागरिक अद्याप चीनमध्ये आहेत. मात्र ते सुरक्षित असून त्यांच्याशी संपर्क साधता येत आहे.

रासुवा येथील एका जलविद्युत प्रकल्पातून चार भारतीय नागरिकांची—रिपु कुमार, चनेश्वर नरजरी, कृपा शंकर आणि मोहम्मद मिन्हाजुद्दीन—सुटका करण्यात आली आहे. त्यांना लवकरच काठमांडू येथे आणले जाण्याची शक्यता आहे. रासुवा हा पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांपैकी एक आहे.

भारताने मदत सामग्री घेऊन चौथे विमान पाठवले

भारताने शनिवारी भारतीय हवाई दलाच्या C-130J लष्करी वाहतूक विमानातून ११ टन मदत सामग्रीची चौथी खेप नेपाळला पाठवली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, या विमानात शोध आणि बचावकार्यांसाठी आवश्यक उपकरणांसह एक तांत्रिक पथकही होते. तसेच डीएनए तपासणीसाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक आणि आवश्यक फॉरेन्सिक उपकरणेही पाठवण्यात आली आहेत. हे फॉरेन्सिक पथक पुरात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी नेपाळी अधिकाऱ्यांना मदत करणार आहे.

याशिवाय, २३० फूट लांबीच्या ‘सिंगल लेन मॉड्युलर स्टील ब्रिज’साठी आवश्यक उपकरणे घेऊन १६ ट्रक नेपाळमध्ये पोहोचले आहेत. आणखी सात बेली ब्रिज उभारण्यासाठी आवश्यक उपकरणे लवकरच पाठवली जाणार आहेत. हे पूल उभारण्यासाठी तांत्रिक पथकेही लवकरच नेपाळमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारताने आतापर्यंत नेपाळला एकूण ६८.५ टन मदत सामग्री पाठवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT