Nirav Modi Bail Rejected
दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील फरार मुख्य आरोपी नीरव मोदी ला लंडन न्यायालयाने झटका दिला आहे. तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी दाखल केलेली नवीन जामीन याचिका गुरुवारी लंडनच्या किंग्ज बेंच डिव्हिजनच्या उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयात सीबीआयच्या जोरदार युक्तिवादामुळे कोर्टाने जामीन नाकारला. यूकेमध्ये अटकेनंतरची त्याची ही दहावी जामीन याचिका आहे.
न्यायालयात सुनावणीदरम्यान, क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस (सीपीएस) च्या वकिलाने जामिनाला जोरदार विरोध केला. मात्र सीबीआय टीमने क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस (सीपीएस) सोबत संपूर्ण प्रकरणात भारत सरकारची बाजू जोरदारपणे मांडली. यासाठी सीबीआय तपास पथक लंडनला पोहोचले होते. नीरव मोदीला जामीन देणे न्यायालयीन प्रक्रियेसाठी हानिकारक ठरू शकते हे सिद्ध करण्यासाठी सीबीआयने जोरदार युक्तिवाद सादर केले. न्यायालयाने त्यांचे युक्तिवाद मान्य केले आणि नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला.
नीरव मोदी १९ मार्च २०१९ पासून लंडनच्या तुरुंगात आहे. सुमारे ६४९८.२० कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील तो मुख्य आरोपी आहे. भारताने त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले असून सीबीआयला त्याला भारतात आणायचे आहे. यूके उच्च न्यायालयाने भारत सरकारच्या बाजूने त्याच्या प्रत्यार्पणाला आधीच मान्यता दिली आहे.