Nimisha Priya (Source- Social Media)
आंतरराष्ट्रीय

Nimisha Priya | निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द झाली आहे का? जाणून घ्या सत्य काय?

येमेनमधील तुरुंगात असलेल्या निमिषा प्रियाच्या फाशीच्या शिक्षेबाबत नवीन अपडेट समोर आली आहे

दीपक दि. भांदिगरे

Nimisha Priya case

यमनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. तिला १६ जुलै रोजी फाशीची शिक्षा दिली जाणार होती. भारतीय ग्रँड मुफ्ती आणि सुन्नी धर्मगुरू कंथापूरम एपी अबूबकर मुसलियार यांच्या हस्तक्षेपानंतर तिच्या फाशीच्या शिक्षा स्थगिती करण्यात आली होती. दरम्यान, येमेनमध्ये निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द झालेली नाही, असे वृत्त एएनआयने मंगळवारी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. या प्रकरणाबाबत काही व्यक्तींकडून शेअर केली जात असलेली माहिती चुकीची असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

याआधी, भारतीय ग्रँड मुफ्ती यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले होते की येमेनमधील सना येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. "निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा, जी आधी स्थगित केली होती, ती आता रद्द करण्यात आली आहे," असे निवेदनात म्हटले आहे.

सना येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत यापूर्वी तात्पुरती स्थगित केलेली मृत्युदंडाची शिक्षा पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यात नमूद केले होते.

केरळमधील ३७ वर्षीय नर्स निमिषा नोकरीच्या निमित्ताने २००८ मध्ये येमेनला गेली. तिथे जाऊन तिने रुग्णालयात नर्स म्हणून काम केले. त्यानंतर तिने २०१५ मध्ये तलाल अब्दो महदी या स्थानिक व्यक्तीसोबत भागीदारी केली आणि तिथे क्लिनिक सुरू केले. परदेशी लोकांना तिथे व्यवसाय करता येत नसल्याने तिने हा एक कायदेशीर मार्ग निवडला होता. २ वर्षे सर्व काही सुरळीत चालले होते. त्यानंतर दोघांमधील संबंध बिघडले आणि तिची व्यवस्था भयावह बनली.

२०१७ मध्ये निमिषाचा व्यावसायिक भागीदार असलेल्या महदीचा मृतदेह एका पाण्याच्या टाकीत आढळून आला. निमिषाने त्याला झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस दिल्याचा आरोप आहे. या घटनेच्या एका महिन्यानंतर, निमिषा प्रियाला येमेन-सौदी सीमेवरून अटक करण्यात आली. तिला २०२० मध्ये, सना येथील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. २०२३ मध्ये, येमेनच्या सर्वोच्च न्यायालयानेही ही फाशीची शिक्षा कायम ठेवली. सध्या निमिषा सना येथील तुरुंगात आहे.

नेमकं काय घडलं?

महदीने भारतातील भेटीदरम्यान काढलेल्या लग्नाच्या फोटोत फेरफार करत आपण निमिषासोबत लग्न केल्याचा खोटा दावा केला होता. त्याने क्लिनिक आपल्या ताब्यात घेतले आणि तिच्या कमाईचे पैसे जबरदस्तीने उकळण्यास सुरुवात केली.

तिच्या कुटुंबाने आरोप केला की त्याने तिचे वारंवार शोषण केले. तिचा शारीरिक छळ करण्यात आला. ड्रग्ज घेऊन तिला मारहाण कण्यात आली. ती येमेनमधून बाहेर जाऊ नये म्हणून तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. तिने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर तिला संरक्षण मिळाले नाही. उलट तिला तुरुंगात टाकण्यात आले. निमिषाने महदीला झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस देऊन तिचा पासपोर्ट परत मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पण महदीचा ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. यामुळे निमिषाला अटक झाली आणि महदीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT