Nigeria Massacre  file photo
आंतरराष्ट्रीय

Nigeria Massacre : जमिनीच्या वादातून १०० जणांना घरांमध्ये जिवंत जाळलं; नायजेरियात भीषण नरसंहार

नायजेरियातील बेन्यू राज्यातील येलवाटा गावात भयंकर हल्ल्यात १०० हून अधिक नागरिक ठार झाले असून अनेक जण बेपत्ता आहेत.

मोहन कारंडे

अबुजा : नायजेरियाच्या बेन्यू राज्यातल्या येलवाटा गावात अत्यंत क्रूर हल्ल्यात १०० हून अधिक जणांना जीवंत जाळले. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल नायजेरियाने शनिवारी ही माहिती दिली. या हल्ल्यानंतर अनेक नागरिक बेपत्ता आहेत. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत या गावावर हल्ला सुरू होता.

या हल्ल्यात नागरिकांना इतके अमानुषपणे मारण्यात आले की, अनेक कुटुंबांना घरात बंद करून जिवंत जाळले. काही मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटवणेदेखील अशक्य झाले. सोशल मीडियावर याचे धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असून गावात मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. शेकडो जण जखमी झाले असून, अनेकांना अद्याप वैद्यकीय सुविधा मिळालेल्या नाहीत. अनेक लोक बेपत्ता असल्याची ॲम्नेस्टी इंटरनॅशनल नायजेरियाने शनिवारी ही माहिती दिली. या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर विस्थापन होत असून, पीडितांमध्ये बहुतांश शेतकरी असल्याने अन्नसुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

शेतकरी-गुराखी संघर्ष पुन्हा उफाळला?

नायजेरियाच्या 'मिडल बेल्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेन्यू राज्यात प्रामुख्याने मुस्लिमबहुल उत्तर आणि ख्रिश्चनबहुल दक्षिण भागांचा संगम होतो. हा प्रदेश जमीन वापरावरून सततच्या संघर्षांनी ग्रासलेला आहे. विशेषतः गुरे चारण्यासाठी कुरणांच्या शोधात असलेले गुराखी आणि शेतीसाठी जमिनीची आवश्यकता असलेले शेतकरी यांच्यातील संघर्ष येथे नित्याचा झाला आहे. वांशिक आणि धार्मिक तणावांमुळे या संघर्षांना अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्याच महिन्यात, बेन्यूच्या मध्य भागातील ग्वार पश्चिम जिल्ह्यात गुराख्यांनी केलेल्या हल्ल्यांत ४२ लोक मारले गेले होते. २०१९ पासून या हिंसक संघर्षांमध्ये ५०० हून अधिक लोकांचा बळी गेला असून सुमारे २२ लाख लोक विस्थापित झाले आहेत.

राज्य सरकारची तातडीची मदत

या हत्याकांडामुळे नायजेरियातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बेन्यूचे राज्यपाल हायसिंथ आलिया यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम येलवाटा गावात पाठवली आहे. "हा हल्ला अत्यंत वेदनादायक आहे. या अमानवी कृत्यास जबाबदार असलेल्यांना न्याय दिला जाईल,” अशी प्रतिक्रिया राज्यपाल कार्यालयाकडून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT