Zohran Mamdani Umar Khalid Pudhari
आंतरराष्ट्रीय

Zohran Mamdani: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला भावनिक पत्र; 'आम्ही तुमच्याबद्दल...'

Zohran Mamdani Writes Letter To Umar Khalid: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी सामाजिक कार्यकर्ता उमर खालिदला भावनिक पत्र लिहिले आहे.

Rahul Shelke

Zohran Mamdani Writes Letter To Umar Khalid: न्यूयॉर्क शहराचे नवनियुक्त महापौर जोहरान ममदानी यांनी जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ता उमर खालिदला एक भावनिक पत्र लिहिल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. सध्या उमर खालिद तिहार कारागृहात यूएपीए कायद्या (बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा) अंतर्गत तुरुंगात आहे.

गुरुवारी जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कचे महापौर म्हणून शपथ घेतली. या शपथविधीनंतर ते अमेरिकेतील सर्वात मोठ्या शहराचे नेतृत्व करणारे पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे महापौर ठरले. याच दिवशी त्यांनी उमर खालिदला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

या पत्रात ममदानी यांनी उमर खालिदचा उल्लेख करत, 'वाईट अनुभवांना स्वतःवर पूर्णपणे हावी होऊ देऊ नये, हे उमर खालिदचे शब्द आपल्याला नेहमी आठवतात', असे मामदानी यांनी पत्रात लिहिले आहे. तसेच, “तुमच्या आई-वडिलांची भेट घेऊन खूप आनंद झाला. आम्ही सगळे तुमच्याबद्दल विचार करत आहोत,” असेही त्यांनी पत्रात लिहिले आहे. या पत्रावर तारीख नमूद केलेली नाही.

अमेरिकेतील आठ खासदारांनी देखील उमर खालिदच्या तुरुंगवासाविरोधात जाहीरपणे आवाज  उठवला आहे. या खासदारांनी वॉशिंग्टनमधील भारतीय राजदूतांना पत्र पाठवून, उमर खालिदला तुरुंगात ठेवल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

जोहरान ममदानी यांनी याआधीही अनेक वेळा उमर खालिदचा उल्लेख केला आहे. जून 2023 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी उमर खालिदने तुरुंगातून लिहिलेल्या पत्रांमधील काही उतारे वाचून दाखवले होते. त्या वेळी ममदानी न्यूयॉर्क राज्य विधानसभेचे सदस्य होते.

Zohran Mamdani Letter

उमर खालिदला सप्टेंबर 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्यावर भारतीय दंड संहिता आणि यूएपीए अंतर्गत गंभीर आरोप दाखल आहेत. गेल्या चार वर्षांहून अधिक काळ तो तुरुंगात असूनही त्याच्या खटल्याची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही. दिल्ली न्यायालयाने त्याला नियमित जामीन देण्यास वारंवार नकार दिला आहे. मात्र, कौटुंबिक कारणांसाठी काही वेळा अंतरिम जामीन देण्यात आला आहे.

अलीकडेच, बहिणीच्या लग्नासाठी 16 ते 29 डिसेंबरदरम्यान त्याला जामीन देण्यात आला होता. मात्र, या काळात त्याच्यावर माध्यमांशी बोलण्यास मनाई आणि सोशल मीडियावर बंदी अशा कडक अटी घालण्यात आल्या होत्या.

न्यूयॉर्कच्या महापौरांकडून आलेल्या या पत्रामुळे उमर खालिदच्या प्रकरणाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधले असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवी हक्क आणि न्यायप्रक्रियेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT