TOI-1752 b हा पृथ्वीपेक्षा मोठा आणि लाव्हारसाने व्यापलेला अत्यंत उष्ण ग्रह आहे; याचे अंदाजित वस्तुमान आपल्या पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे ४.३५ पट आहे. 
आंतरराष्ट्रीय

Earth like planet : सूर्यमालेबाहेर दोन नवीन ग्रहांचा शोध; एक ग्रह असू शकतो पृथ्वीसारखा!

स्पॅनिश संशोधकांची घोषणा : लाल खुजा ताऱ्याभोवती फिरणाऱ्या 'सुपर-अर्थ'वर द्रवरूप पाण्याचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

Earth Like Planet Discovery News : आपल्या सूर्यमालेबाहेर अंतराळातील विश्वात दोन नवीन बाह्यग्रहांचा शोध लावण्यात खगोलशास्त्रज्ञांना यश आले आहे. स्पॅनिश संशोधकांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय पथकाने ३१ ऑगस्ट रोजी या दोन नवीन ग्रहांच्या शोधाची घोषणा केली. विशेष म्हणजे, यातील एक ग्रह आपल्या पृथ्वीसारखा राहण्यायोग्य असू शकतो, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन नवीन ग्रहांना 'TOI-1752 b' आणि 'TOI-1752 c' अशी नावे देण्यात आली आहेत.

राहण्यायोग्य 'सुपर-अर्थ'

अंतराळातील विश्वात दोन नवीन बाह्यग्रहांचा शोध लावण्यात खगोलशास्त्रज्ञांना यश आले आहे. यातील TOI-1752 b: हा ग्रह आकाराने पृथ्वीपेक्षा मोठा असून तो अत्यंत तप्त आणि खडकाळ (लावा) स्वरूपाचा आहे. याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे ४.३५ पट आहे.TOI-1752 c: या शोधातील सर्वात महत्त्वाचा आणि उत्सुकता वाढवणारा ग्रह म्हणजे 'TOI-1752 c'. शास्त्रज्ञांच्या मते, हा ग्रह राहण्यायोग्य वातावरणाचा 'सुपर-अर्थ' असू शकतो. याचे वस्तुमान पृथ्वीच्या ५.२० पट असून तो खडकाळ स्वरूपाचा आहे. योग्य वातावरण असल्यास या ग्रहाच्या पृष्ठभागावर द्रवरूप पाणी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

३३७ प्रकाशवर्षे दूर असणारा तारा

हे दोन्ही ग्रह 'TOI-1752' नावाच्या एका लाल खुजा ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. हा तारा पृथ्वीपासून सुमारे ३३७ प्रकाशवर्षे दूर, 'ड्रॅको' नक्षत्राच्या दिशेने स्थित आहे. हा तारा आपल्या सूर्याच्या मानाने आकाराने लहान, कमी वस्तुमानाचा आणि थंड आहे. लाल खुजे तारे आकाराने लहान असल्याने, जेव्हा एखादा ग्रह त्यांच्यावरून प्रवास करतो, तेव्हा ताऱ्याच्या प्रकाशात होणारा सूक्ष्म बदल टिपणे खगोलशास्त्रज्ञांना सोपे जाते. त्यामुळेच सध्या अशा ताऱ्यांभोवती लहान ग्रहांचा शोध घेण्यावर भर दिला जात आहे.

आंतरराष्ट्रीय पथकाचे संयुक्त संशोधन

हा शोध 'ट्रांझिट पद्धती' वापरून लावण्यात आला आहे. जेव्हा एखादा ग्रह आपल्या ताऱ्यासमोरून जातो, तेव्हा ताऱ्याच्या प्रकाशात पडणाऱ्या तात्पुरत्या खंड पडण्यावरून ग्रहाची उपस्थिती नोंदवली जाते. हे संशोधन ग्रॅनाडा येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स ऑफ अंदालुसिया' आणि स्पेनच्या 'नॅशनल रिसर्च कौन्सिल'चे अल्बर्टो पेलेझ टोरेस यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या संशोधनात कॅनरी बेटांवरील 'इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स' (MuSCAT2 साधन), टोकियो विद्यापीठाचा बाह्यग्रह संशोधन गट (हवाई येथील MuSCAT3 साधन) या संस्थांचाही महत्त्वाचा सहभाग होता.

वातावरणाचा अभ्यास करण्‍याचे आव्हान

या दोन्ही ग्रहांच्या शोधानंतर आता शास्त्रज्ञांसमोर सर्वात मोठे आव्हान या ग्रहांच्या वातावरणाचा अभ्यास करण्याचे आहे. भविष्यातील प्रगत अंतराळ दुर्बिणींच्या साहाय्याने या ग्रहांच्या वातावरणातून पार होणाऱ्या ताऱ्याच्या प्रकाशाचे विश्लेषण केले जाईल. यामुळे तेथील वातावरणात कोणकोणते घटक आहेत आणि खरोखरच तिथे पाण्याचे अस्तित्व शक्य आहे का, हे स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT