Nepal Flood VIDEO Pudhari
आंतरराष्ट्रीय

Nepal Flood: पाऊस नसताना नेपाळमध्ये महापूर; आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू, 41 हून अधिक जण बेपत्ता, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Nepal Flood VIDEO: नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

Rahul Shelke

Nepal Flood VIDEO: नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी हानी झाली आहे. या पुरात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून 41 हून अधिक जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. तिबेटमधून नेपाळमध्ये येणाऱ्या भोटेकोशी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने नदीकाठच्या परिसरात हाहाकार उडाला.

या अचानक आलेल्या पुरात अनेक बाजारपेठा पाण्याखाली गेल्या असून काही जलविद्युत प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले आहे. परिस्थिती गंभीर असल्याने प्रशासनाने त्रिशूली नदीच्या खालच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे.

पाऊस नसतानाही अचानक आला महापूर

या पुरामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रसुवा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा अधिकारी नरेंद्र परियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालय आणि आसपासच्या भागात पाऊसच झाला नव्हता. हवामानही स्वच्छ होते.

त्यामुळे कोणताही मोठा पाऊस न पडता नदीला अचानक एवढा प्रचंड पूर कसा आला, याचा शोध सुरू आहे. प्रशासनाने वरच्या हिमालयीन भागात एखादे हिमनदी तलाव फुटले असावे किंवा पाण्याचा तात्पुरता अडथळा तुटला असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतपणे स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

बाजारपेठा आणि जलविद्युत प्रकल्पांना फटका

पुराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेकांना जणू एखादे धरण अचानक फुटल्यासारखे वाटले. स्थानिक नागरिक अजय श्रेष्ठ यांनी पाण्याचा प्रवाह अत्यंत जोरात असल्याचे सांगितले. या पुरात चिलिमे जलविद्युत प्रकल्पासह इतर काही हायड्रोपॉवर प्रकल्पांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

नदीतील पाण्याचा जोर कायम असल्याने नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांतील काही भागांवरही पुराचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या भागातील नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बचावासाठी गेलेले हेलिकॉप्टरही उतरू शकले नाही

पुरामुळे आणि भूस्खलनामुळे तिमुरे परिसरात अनेक लोक अडकून पडल्याची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी एल्टिट्यूड एअरचे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले, मात्र परिस्थिती इतकी गंभीर होती की हेलिकॉप्टरला तेथे उतरताच आले नाही.

पायलटने दिलेल्या माहितीनुसार, पुराच्या प्रचंड प्रवाहात तिमुरे येथील हेलिपॅडच वाहून गेले आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी सुरक्षित जागाच शिल्लक राहिली नव्हती.

आकाशातून पाहिल्यानंतर तिमुरे गावातील परिस्थितीही अत्यंत भयावह असल्याचे दिसून आले. गावातील अनेक भागांत पुराचे पाणी गेले आहे, तसेच काही भाग मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले असून गावाचा मोठा भाग स्पष्टपणे दिसतही नव्हता.

बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू

या आपत्तीनंतर प्रशासन आणि बचाव पथकांकडून बेपत्ता लोकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पुरामुळे रस्ते आणि इतर संपर्क व्यवस्था बाधित झाल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत.

आतापर्यंतच्या प्राथमिक माहितीनुसार 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 41 हून अधिक जण बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेपाळमध्ये पाऊस नसतानाही अचानक आलेल्या या महापुराने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. वरच्या हिमालयीन भागात नेमके काय घडले, नदीच्या पाण्यात इतकी अचानक वाढ कशी झाली आणि या पुरामुळे किती मोठे नुकसान झाले, याचे कारण पुढील तपासानंतरच समोर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT