Nepal flash floods File Photo
आंतरराष्ट्रीय

Nepal flash floods: नेपाळमध्ये महाप्रलयाचे तांडव: १६० जणांचा मृत्यू; १३३ भारतीयांसह ८४४ जण बेपत्ता

नेपाळ-तिबेट सीमेवरील भागात बुधवारी सकाळी भोटे कोशी आणि त्रिशुली नद्यांना आलेल्या अभूतपूर्व पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार उडाला आहे.

मोहन कारंडे

Nepal flash floods

काठमांडू: नेपाळ-तिबेट सीमेवरील भागात बुधवारी सकाळी भोटे कोशी आणि त्रिशुली नद्यांना आलेल्या अभूतपूर्व पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार उडाला आहे. काही मिनिटांतच तब्बल ३० फुटांपर्यंत वाढलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने अनेक गावे, जलविद्युत प्रकल्प आणि कैलास-मानसरोवर यात्रेचा मार्ग वाहून नेला. या महाप्रलयात आतापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला असून, १३३ भारतीय नागरिकांसह सुमारे ८४४ हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत.

कैलास-मानसरोवर यात्रेकरू पुराच्या तावडीत

नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये १५७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर तिबेटच्या केरोंग प्रांतात ३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद चीनी अधिकाऱ्यांनी केली आहे. बेपत्ता ५७९ परदेशी नागरिकांमध्ये अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि मलेशियासह २८ देशांतील पर्यटकांचा समावेश आहे. यात १३३ भारतीय आणि ३७ अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. पुराचा वेग इतका तीव्र होता की घटनास्थळापासून १५० किमी अंतरावर असलेल्या चितवन भागात ३३ मृतदेह सापडले आहेत.

सुरक्षा यंत्रणांनाही फटका; मदतकार्य युद्धपातळीवर

नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, रसुवा येथील पोलीस आणि सैनिकांचे बॅरेक्स पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने २९ पोलीस आणि ४४ सैनिक बेपत्ता आहेत. याशिवाय लंगटांग खोला जलविद्युत प्रकल्पातील अनेक कामगार आणि सीमाशुल्क विभागाचे अधिकारी संपर्कक्षेत्राबाहेर आहेत.

नेपाळचे पंतप्रधान शाह यांनी देशवासीयांना धैर्य राखण्याचे आवाहन केले असून, नेपाळी सेना, पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाने हेलिकॉप्टर, ड्रोन व बोटींच्या मदतीने शोध आणि बचाव मोहीम तीव्र केली आहे. दुसरीकडे, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनीही बेपत्ता नागरिकांच्या शोधासाठी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान; आपत्कालीन परिस्थिती जाहीर

या नैसर्गिक आपत्तीत सुमारे १९ पूल, ४० किमी लांबीचे रस्ते, १३ जलविद्युत प्रकल्प आणि २०० हून अधिक ट्रक वाहून गेले आहेत. नेपाळ सरकारने सर्वाधिक प्रभावित झालेल्या क्षेत्रांना पुढील ३ महिन्यांसाठी 'आपत्तीग्रस्त भाग' म्हणून घोषित केले असून, जखमींवर मोफत उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. हवामान, खचलेले रस्ते आणि चिखलामुळे मदतकार्यात मोठे अडथळे येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT