आंतरराष्ट्रीय

१९९९ चा लाहोर करार काय होता? ज्यावर नवाझ शरीफ यांनी २५ वर्षांनंतर चूक केली कबूल

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मंगळवारी कबूल केले की, पाकिस्तानने १९९९ च्या भारतासोबतच्या लाहोर घोषणा कराराचे उल्लंघन केले होते. ज्यावर त्यांनी आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वाक्षरी केली होती. 'ती आमची चूक होती' असे जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या काळातील कारगिल युद्धाचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांनी सांगितले.

नवाज शरीफ यांनी त्यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-एनच्या बैठकीत कारगिल युद्धाच्या संदर्भात जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, २८ मे १९९८ रोजी पाकिस्तानने पाच अणुचाचण्या घेतल्या. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी येथे येऊन आमच्याशी करार केला, पण आम्ही त्या कराराचे उल्लंघन केले, ती आमची चूक होती.

१९९९ चा लाहोर करार काय होता?

नवाज शरीफ आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी शिखर परिषदेनंतर २१ फेब्रुवारी १९९९ रोजी लाहोर घोषणापत्रावर स्वाक्षरी केली होती. दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी हा करार करण्यात आला होता, मात्र काही महिन्यांनंतर जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात पाकिस्तानने घुसखोरी केल्याने कारगिल युद्ध झाले. मार्च १९९९ पासून परवेझ मुशर्रफ पाकिस्तानी लष्कराचे जनरल होते, त्यांनी लडाखमधील कारगिल जिल्ह्यात सैन्याच्या गुप्त घुसखोरीचे आदेश दिले होते. नंतर युद्ध सुरू झाले आणि भारताने युद्ध जिंकले, त्यावेळी शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होते.

क्लिंटन यांची ५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची ऑफर

पाकिस्तानने मंगळवारी १९९८ मध्ये पहिल्या अणुचाचणीचा २६ वा वर्धापन दिन साजरा केला. पाकिस्तानने २८ मे १९९८ रोजी बलुचिस्तान प्रांतातील चाघी हिल्समध्ये सहा अणुचाचण्या केल्या होत्या. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला अणुचाचण्या करण्यापासून थांबवण्यासाठी पाच अब्ज अमेरिकन डॉलर देण्याची ऑफर दिली होती. पण ती मी नाकारली, माझ्या जागी इमरान खान सारखा व्यक्ती पाकिस्तानचा पंतप्रधान असता तर क्लिंटनची ऑफर स्विकारली असती, असे नवाज शरीफ यांनी म्हटले आहे. नवाज शरीफ यांची सहा वर्षांनंतर मंगळवारी 'पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ'च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. पनामा पेपर्स प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवाज यांना हे पद सोडावे लागले होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT